नांदेड : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दलाने राबविलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आरपीएफ नांदेड विभागाने महत्त्वपूर्ण क

नांदेड : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दलाने राबविलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आरपीएफ नांदेड विभागाने महत्त्वपूर्ण कारवाई करत प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी करणार्या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. विविध रेल्वे स्थानकांवर ही कारवाई करण्यात आली असून प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.12एप्रिल रोजी रात्री परभणी रेल्वे यार्ड परिसरात गुप्त पाहणी दरम्यान आरपीएफ व शासकीय रेल्वे पोलिसांच्या संयुक्त पथकाने रवींद्र (रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील स्पोर्ट्स बॅगची तपासणी केली असता विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. यात दोन रिअलमी, एक रेडमी, एक इन्फिनिक्स आणि एक पोको कंपनीचा मोबाईल समाविष्ट असून त्यांची एकूण किंमत 63 हजार 400 रुपये इतकी आहे. चौकशीत हे मोबाईल परभणी स्थानकावरील प्रवाशांकडून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, 13 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात आरपीएफ, सीआयबी आणि शासकीय रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत संशयास्पद हालचाली करणार्या तिघांना ताब्यात घेतले. यात अन्सारी, शकील आणि फैजान (सर्व रा. नाशिक) यांचा समावेश आहे. हे तिघे वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांच्या थांब्यादरम्यान प्लॅटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरुद्ध बीएनएसएस कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आरपीएफ नांदेड विभागाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सातत्याने दक्षता मोहीम सुरू ठेवली असून प्रवाशांनीही आपले सामान सांभाळून ठेवावे व कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ रेल्वे सुरक्षा कर्मचार्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS