माहूर : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी माहूर तालुका दौर्

माहूर : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी माहूर तालुका दौर्यात प्रथमच येथील शासकीय विश्रामगृहात विविध विभागांची सविस्तर आढावा बैठक घेतली. माहूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे 829 कोटी रुपयांच्या निधीच्या आराखड्यावर संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करण्यात आली.
पालकमंत्री सावे यांचे सकाळी 10 वाजता माहूर येथे आगमन झाले. यावेळी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी झेनितचंद्र दोनतुला आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार केराम यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. विविध पदाधिकार्यांनीही सावे यांची भेट घेऊन स्थानिक प्रश्न मांडले. दौर्यादरम्यान पालकमंत्र्यांनी दत्तशिखर येथे दत्त प्रभूंचे दर्शन घेत महंत डॉ. धनेश्वर भारती यांची भेट घेतली. तेथील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर रेणुका मातेचे दर्शन घेऊन स्काय वॉकच्या कामाचा आढावा घेत संबंधित यंत्रणेला 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृहात तालुकास्तरीय आढावा बैठकीस सुरुवात झाली. यामध्ये शहरातील वीज समस्या, रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, जलजीवन मिशनची प्रलंबित कामे, कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकर्यांच्या मालासाठी गोदाम उभारणी यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच धनोडा येथील पैनगंगा नदीवरील पूल 30 मेपर्यंत सुरू करण्याचे निर्देश सावे यांनी दिले. माहूर शहर व तालुक्याच्या विकासासंदर्भात प्राप्त सूचनांची दखल घेत अधिकार्यांना त्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पाणीटंचाई, जलजीवन मिशन, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रातील प्रश्नांवरही चर्चा केली. या बैठकीस तहसीलदार अभिजित जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी. के. भिसे, शाखा अभियंता आकाश राठोड, दत्तशिखर संस्थानचे विश्वस्त प्रा. डॉ. गणेश पाटील, व्यवस्थापक जे. एन. नाईक, रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, तालुका आरोग्य अधिकारी राजेश माचेवार तसेच नगरसेवक गोपुभाऊ महामुने, अनिल वाघमारे, श्यामराव कुमरे, विजय आमले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS