अकोले : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आकर्षक ऑफर्स, मोफत गिफ्ट आणि बक्षिसांचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याचा इशारा साम

अकोले : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आकर्षक ऑफर्स, मोफत गिफ्ट आणि बक्षिसांचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व कर सल्लागार अतुल बोऱ्हाडे यांनी दिला आहे. व्हॉट्सॲप, सोशल मीडिया किंवा एसएमएसद्वारे पाठविण्यात येणाऱ्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक केल्यानंतर एपीके किंवा झीप फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले जाते. अशा फाईल्स इन्स्टॉल झाल्यास मोबाईलवरील माहिती धोक्यात येण्याबरोबरच संपर्क यादीतील इतरांनाही त्याच फसव्या लिंक्स पाठवल्या जाण्याची शक्यता असते. मोबाईल अचानक हँग होणे, गरम होणे, अनोळखी संदेश आपोआप पाठवले जाणे किंवा बँक खात्यात संशयास्पद व्यवहार दिसणे ही सायबर हल्ल्याची संभाव्य लक्षणे असल्याचे बोऱ्हाडे यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांना अनोळखी लिंक्सवर क्लिक न करण्याचे, गूगल प्ले स्टोर व्यतिरिक्त इतरत्रून ॲप्स डाउनलोड न करण्याचे, ओटीपी, पासवर्ड किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर न करण्याचे तसेच मोबाईल नियमित अपडेट ठेवण्याचे आवाहन केले. “एक चुकीची क्लिक तुमची आर्थिक आणि वैयक्तिक माहिती धोक्यात आणू शकते. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि इतरांनाही जागरूक करा,” असे आवाहन कर सल्लागार अतुल बोऱ्हाडे यांनी केले. मागील काही दिवसांचा इतिहास पाहता अहिल्यानगर जिल्ह्यातच सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शिक्षक फसवणूक, व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक या घटना ताज्या आहेत. चुकीच्या लिंकवर क्लिक केल्याने एका व्यावसायिकाचे लाखो रुपये एका सेकंदात गायब झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचाच विचार करता जवळपास कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे समोर येते. त्यामुळे याबाबतीत जनजागृती होणे आणि सर्वसामान्यांसह सर्वच व्यक्तींनी याबाबत अलर्ट राहणे गरजेचे असल्याचे मत सध्या तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

COMMENTS