Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

11 वी ऑनलाईन प्रवेशाचा श्रीगणेशा; 30 एप्रिलपर्यंत मुदत; नांदेड जिल्ह्यात तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन : माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांचे आवाहन

नांदेड : नांदेड जिल्ह्यात इयत्ता 11 वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला अधिकृतरीत्या सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबाबत उत्सा

दहावीचा निकाल जाहीर; मुलींनीच मारली बाजी ९२.०९ टक्क्यांसह राज्याचा निकाल लागला; कोकण विभाग टॉपवर
दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीड येथे प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्र सुरू
आदित्य कृषी महाविद्यालयात 257 विद्यार्थ्यांना निरोप; संस्कारांची शिदोरी घेऊन भावी अधिकारी नव्या क्षितिजाकडे

नांदेड : नांदेड जिल्ह्यात इयत्ता 11 वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला अधिकृतरीत्या सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार 10 एप्रिलपासून विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्जाचा भाग-1 भरता येणार आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय इयत्ता 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता सर्व विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून सुरक्षित ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी, संकेतस्थळ वापरातील समस्या किंवा कागदपत्र पडताळणीबाबत अडथळे येऊ नयेत यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या नियंत्रण कक्षांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सहाय्य आणि आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आतापासून तयार ठेवावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), जातीचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आदी कागदपत्रांचा समावेश आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्यास प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. सध्या केवळ अर्जाचा भाग-1 म्हणजे नोंदणी प्रक्रिया सुरू असून, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवड, शाखा प्राधान्यक्रम व अर्जाचा भाग-2 भरण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच कला, विज्ञान व वाणिज्य शाखांतील उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी नांदेड जिल्ह्यातील 256 महाविद्यालयांनी या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यंदाही मोठ्या प्रमाणावर प्रवेशक्षमता उपलब्ध असून विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 29 हजार 40 जागा उपलब्ध असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. ज्या शाळांमध्ये दहावीबरोबरच अकरावीचे वर्ग चालतात, त्या शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी संगणक, इंटरनेट व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याने पालकांनीही सजग राहून मुलांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS