नवी दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला मंगळवारी पुन्हा एकदा उध
नवी दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला मंगळवारी पुन्हा एकदा उधाण आले. सोमवारी सायंकाळी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करत विद्यार्थ्यांना पांगवले होते. मात्र, मंगळवारी सकाळपासूनच महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेले हजारो विद्यार्थी पुन्हा एकत्र जमले असून त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपाहाराचे वाटप केले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सध्या संसदेवर मोर्चा काढला जाणार नाही, मात्र आंदोलन अधिक तीव्रतेने सुरूच राहील. दरम्यान, सोमवारी झालेल्या लाठीमारानंतर समाजसेवक सोनम वांगचुक यांनीही आपले उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेससह विरोधी पक्षा आक्रमक; संसदेत चर्चेची मागणी
विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या बळप्रयोगावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार के. सी. वेणुगोपाल, कपिल सिब्बल, शशी थरूर आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारने संसदेत यावर सविस्तर निवेदन द्यावे आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
खासदार राहुल गांधींनी घेतली जखमी विद्यार्थ्यांची भेट
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी रुग्णालयात जाऊन लाठीचारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. केवळ शिक्षणमंत्र्यांनीच नव्हे तर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनीही या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
काँग्रेसचे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर अचानक धरणे आंदोलन
जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर अचानक धरणे आंदोलन छेडले. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेत्यांनी यात सहभाग घेतला. याप्रकरणी केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारून तातडीने निर्णय घ्यावा, अशी निदर्शने यावेळी करण्यात आली.
पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा मिळणार: पंतप्रधान मोदी
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली. पेपरफुटीच्या प्रत्येक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच या संवेदनशील विषयाचे राजकारण न करता विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS