अकोले : शासनाच्या ‘आपले सरकार’ संकेतस्थळावरील नव्या प्रक्रियात्मक सुधारणा प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर अकोले तालुक्यातील सेतू व महा ई-सेवा केंद्रां

अकोले : शासनाच्या ‘आपले सरकार’ संकेतस्थळावरील नव्या प्रक्रियात्मक सुधारणा प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर अकोले तालुक्यातील सेतू व महा ई-सेवा केंद्रांमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना आवश्यक दाखले मिळण्यात प्रचंड विलंब होत असून, ही यंत्रणा सुरळीत होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ऑफलाइन दाखल्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने तहसीलदार डॉ. सिद्धार्थकुमार मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर आणि कार्याध्यक्ष महेश नवले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोले हा आदिवासी व भौगोलिकदृष्ट्या दुर्गम तालुका असून येथील विद्यार्थी मोठ्या कष्टाने शिक्षण घेत आहेत. मात्र, सध्या सर्व्हर डाऊन असणे, लॉगइन न होणे, कागदपत्रे अपलोड न होणे अशा तांत्रिक अडचणींमुळे दाखले मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, यंदा १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासह पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मोठ्या अडचणी येत आहेत.
महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती आणि शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेले उत्पन्न, जात, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दाखल्यांभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, याकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण किंवा रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रा. डॉ. सुनील शिंदे, राम रुद्रे, रामदास पांडे, भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकार्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

COMMENTS