अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वरील अहिल्यानगर ते सावळीविहीर या मार्गाचे बांधकाम सुरू असतानाच त्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस

अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वरील अहिल्यानगर ते सावळीविहीर या मार्गाचे बांधकाम सुरू असतानाच त्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडणे, रस्ता खचणे तसेच बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य खराब होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण कामाची तातडीने संयुक्त स्थळ पाहणी करून बांधकाम साहित्याचे नमुने घेण्यात यावेत आणि त्यांची गुणनियंत्रण प्रयोगशाळेत तपासणी करावी. तपासणी अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कुशाबापू पवार यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० च्या बांधकामासाठी निविदा प्रक्रियेनंतर कार्यारंभ आदेश देण्यात आला असून, २९ एप्रिल २०२५ पासून या महामार्गाच्या उभारणीचे काम सुरू आहे. मात्र, काम सुरू होऊन बराच कालावधी उलटूनही अपेक्षित वेगाने प्रगती होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यातच पावसाळ्यात महामार्गाच्या विविध भागांत खड्डे पडणे आणि काही ठिकाणी रस्ता खचण्याच्या घटना घडल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. महामार्गाच्या बांधकामावर आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाला असतानाही अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था समाधानकारक नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही भागांत रस्त्यावर खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्ता खचल्याचेही निदर्शनास आले आहे. महामार्गावरील पूल तसेच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी उभारण्यात आलेल्या मोठ्या व लहान नाल्यांच्या बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी बांधकामाची पडझड झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे महामार्गासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता, त्याचे प्रमाण आणि निर्धारित बांधकाम निकषांचे पालन झाले आहे का, याची सखोल तपासणी करण्याची मागणी होत आहे.
महामार्गाच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या साहित्याची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी बांधकाम करणारी संस्था, संबंधित कंपनीचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, गुणनियंत्रण अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संयुक्त स्थळ पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पाहणीदरम्यान विविध ठिकाणांवरून बांधकाम साहित्याचे नमुने घेऊन ते मान्यताप्राप्त गुणनियंत्रण प्रयोगशाळेत तपासण्यात यावेत. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बांधकामात अनियमितता किंवा निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
सुरक्षित प्रवासासाठी दर्जादार कामाची गरज महामार्गाचे काम रडखडल्याने आणि काही ठिकाणी रस्त्याची अवस्था खराब झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गाचे काम निर्धारित निकषांनुसार, दर्जादार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने स्थळ पाहणी व गुणवत्तेची तपासणी करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन दादासाहेब कुशाबापू पवार यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे दिले आहे.

COMMENTS