देवळाली प्रवरा : राहुरी शहरासह तालुक्यातील काही भागात काल शनिवारी (८ ऑगस्ट) रात्री १० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाच

देवळाली प्रवरा : राहुरी शहरासह तालुक्यातील काही भागात काल शनिवारी (८ ऑगस्ट) रात्री १० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. नाशिकच्या उत्तर-वायव्य दिशेला सुमारे ४९ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती असून, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या भूकंपाची अधिकृत नोंद केली आहे.
रात्रीच्या वेळी अचानक घरांना हादरा जाणवल्याने काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही घरांवरील पत्रे थरथरली, तर काही ठिकाणी मांडणीवरील भांडी खाली पडल्याचे नागरिकांनी सांगितले. घरातील वस्तूंना किरकोळ हादरे बसल्याने अनेकांना भूकंपाची तीव्रता जाणवली.
भूकंपाचा धक्का जाणवताच अनेक नागरिकांनी तत्काळ घराबाहेर येत शेजारी व नातेवाईकांशी संपर्क साधला. काहींनी मोबाईलवरून एकमेकांना फोन करून आपल्या परिसरातही भूकंपाचा धक्का जाणवला का, याची खात्री करून घेतली. रात्रीची वेळ असल्याने सुरुवातीला नेमके काय घडले, याबाबत नागरिकांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला.
भूकंपाचा धक्का जाणवण्यापूर्वी किंवा त्याचवेळी ग्रामीण भागातील काही पाळीव प्राण्यांमध्ये अस्वस्थता जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. घरांच्या परिसरात बसलेली जनावरे अचानक उठल्याचे, तर काही ठिकाणी पाखरांनी काही काळ किलबिलाट केल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले.
भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने मोठी दुर्घटना टळली. तालुक्यातील विविध भागांत नागरिकांनी एकमेकांशी संपर्क साधून भूकंपाची माहिती घेतली. सोशल मीडियावरही भूकंपाच्या धक्क्याबाबत चर्चा सुरू झाली.
दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, रात्रीच्या वेळी अचानक जाणवलेल्या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार ३.८ रिश्टर स्केलचा हा भूकंप नोंदविण्यात आला असून, नाशिकच्या उत्तर-वायव्य दिशेला ४९ किलोमीटर अंतरावर त्याचे केंद्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सौम्य धक्का असला तरी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
अकोले संगमनेरमध्येही धक्के अकोले तालुक्यातील कळस, सुगाव, औरंगपूर या गावांमध्ये तसेच संगमनेर तालुक्यातील काही गावांमध्ये शनिवारी (दि. 8) रात्री दहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांकडून समजली. भूकंपाचे अचानक सौम्य धक्के जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, यामध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, याबाबत प्रशासनाकडूनच अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतरच दुजोरा मिळू शकतो.

COMMENTS