नांदेड : नांदेड महानगरपालिकेतील शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण हा विभाग शहराच्या सर्वांगीण विकासाचा कणा मानला जातो. समाजाच्या संवेदनशील घटकांशी

नांदेड : नांदेड महानगरपालिकेतील शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण हा विभाग शहराच्या सर्वांगीण विकासाचा कणा मानला जातो. समाजाच्या संवेदनशील घटकांशी थेट नाते जोडणारा हा विभाग केवळ प्रशासनिक जबाबदारी नसून, शहराच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणारा महत्त्वाचा स्तंभ आहे. या विभागाच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर सदिच्छा सोनी- पाटील यांनी कार्यारंभापासूनच सक्रिय, संवेदनशील आणि परिणामकारक नेतृत्वाची मोहर उमटवली आहे.
पदभार स्वीकारताच त्यांनी देगलूर नाका परिसरातील हैदरबाग येथील दवाखान्याला अचानक भेट देत तेथील परिस्थितीचा सखोल आढावा घेतला आणि संबंधितांना आवश्यक त्या सूचना देत कार्यक्षमतेचा संदेश दिला. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस त्यांनी महापालिकेच्या शाळांकडे विशेष लक्ष केंद्रित करत अचानक भेटींची मालिका सुरू केली आहे. या शाळाभेटी औपचारिकतेपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा थेट अनुभव घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ठरत आहेत. शिक्षणाची गुणवत्ता, शाळांतील उपक्रम, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच पायाभूत सुविधांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांशी संवाद साधला. शाळांतील समस्या व गरजांची अचूक नोंद घेऊन त्या सोडवण्याची ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. सौ. पाटील यांनी स्पष्ट केले की, महापालिका शाळांमध्ये डिजिटल शिक्षण व ई-लर्निंगसारख्या आधुनिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाईल. शाळांची गुणवत्ता, उपस्थिती आणि निकाल यावर बारकाईने लक्ष ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. शिक्षकांची उपस्थिती, कामगिरी व शिस्त यांचे परीक्षण करून शिक्षण व्यवस्थेत अधिक शिस्त आणि परिणामकारकता आणली जाईल. निकाल सुधारण्यासाठी विशेष योजना आखण्यात येणार असून, कमी दर्जाच्या शाळांसाठी लक्ष केंद्रित उपाययोजना केल्या जातील. तसेच स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर दिला जाईल. शाळांच्या दुरुस्ती, पाणी, स्वच्छता, वर्गखोल्या अशा मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी निधी प्रस्तावित करून समस्या दूर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके, गणवेश आणि मध्यान्ह भोजन योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल. विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर योजना राबवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शाळांच्या इमारती, प्रयोगशाळा आणि संगणक सुविधा सुधारून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देण्यासोबतच पालक, विद्यार्थी व शिक्षकांच्या तक्रारी त्वरित सोडवण्यावर भर दिला जाईल. सौ. सदिच्छा सोनी – पाटील यांची ही कार्यशैली नांदेड शहराच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारी ठरत असून, त्यांच्या पुढाकारामुळे महापालिका शाळांमध्ये नवचैतन्य आणि उज्ज्वल भवितव्याची आशा निर्माण झाली आहे.

COMMENTS