बारूळ : कंधार तालुक्यातील मन्याड खोर्यात, मानार जलाशयाच्या कुशीत वसलेले बारूळ हे गाव ग्रामदैवत श्री शंभू महादेवांच्या कृपाशीर्वादाने नावलौकिकास

बारूळ : कंधार तालुक्यातील मन्याड खोर्यात, मानार जलाशयाच्या कुशीत वसलेले बारूळ हे गाव ग्रामदैवत श्री शंभू महादेवांच्या कृपाशीर्वादाने नावलौकिकास आले आहे. येथील शेकडो वर्षांची पारंपरिक यात्रा सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे जिवंत उदाहरण ठरली असून ‘सर्व धर्म समभाव’ या मूल्याची प्रचीती येथे अनुभवायला मिळते.
चैत्र शुद्ध एकादशीपासून सुरू होणारी ही यात्रा परंपरेचा वारसा जपत नव्या पिढीला प्रेरणा देत आहे. बारूळ येथील श्री शंभू महादेव मंदिर हे महाराष्ट्रात सिंहासनावरील एकमेव म्हणून प्रसिद्ध असून यात्रेची सुरुवात विधिवत काठी स्थापनेने होते. काशाय वस्त्रात लपेटलेली महादेवाची काठी गावाच्या मध्यवर्ती चौकात भक्तांच्या जल्लोषात नृत्य करत नेली जाते, ज्यामुळे वातावरण भक्तिमय होते. या यात्रेचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे मांडव उभारणीची परंपरा मुस्लिम बांधवांकडून जपली जात आहे. स्वर्गीय मेहबुबसाब शेख छोटूमिया यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही त्यांच्या पुढील पिढीकडून निष्ठेने पुढे नेली जात आहे. यामुळे धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श समाजासमोर उभा राहतो. चैत्र शुद्ध द्वादशीला सर्व जातीधर्मीय भाविकांकडून आंबील, गूळ-साखरेचा नैवेद्य दाखवून यात्रेला औपचारिक प्रारंभ होतो. पूर्वी शाहिर नरसिंग भैया ठाकूर व शेख अली यांच्या कलगीतुरा कार्यक्रमांमधून लोकप्रबोधन केले जात असे. सध्या मंदिर संस्थान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वारसा टिकवून ठेवत आहे. कोरोना महामारीच्या काळात यात्रा स्थगित ठेवावी लागली होती. मात्र, त्या कठीण परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जपत मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख 1 हजार रुपयांची मदत देत आदर्श घालून दिला. यात्रेनिमित्त चार दिवस विविध उपक्रमांची रेलचेल असते. नवयुवकांच्या पुढाकारातून रक्तदान व आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. क्रीडाप्रेमींसाठी क्रिकेट सामने, तसेच ‘मानार फेस्टिवल’ अंतर्गत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. मराठमोळ्या लावणी कार्यक्रमांमध्ये सुरेखा पुणेकर, पल्लवी जाधव, सुजाता कुंभार, तृप्ती सावंत, गंगुबाई नॉन मॅट्रिक यांसारख्या नामांकित कलाकारांनी हजेरी लावली आहे. यात्रेचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे जंगी कुस्त्यांचा फड, ज्यामध्ये राज्यभरातील नामांकित कुस्तीपटू सहभागी होतात. शेवटच्या दिवशी महादेवाची काठी मानाच्या घरी नेऊन वस्त्र उतरविण्याच्या विधीनंतर यात्रेची सांगता होते. यात्रा काळात पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून सुरक्षेची काटेकोर व्यवस्था केली जाते. परंपरा, संस्कृती, सामाजिक सलोखा आणि लोकप्रबोधन यांचा सुंदर संगम साधणारी बारूळची श्री शंभू महादेव यात्रा ‘नवसाला पावणारे देवस्थान’ म्हणून जिल्ह्यात विशेष प्रसिद्ध झाली आहे.

COMMENTS