नांदेड : जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत असताना, वाढते गुन्हे, अवैध धंद्यांचे जाळे, शहरातील असुरक्षिततेची भावना आणि पोलिसांबाबत वाढ

नांदेड : जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत असताना, वाढते गुन्हे, अवैध धंद्यांचे जाळे, शहरातील असुरक्षिततेची भावना आणि पोलिसांबाबत वाढती नाराजी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे यांच्या नांदेड दौर्याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. शहरातील प्रश्नांवर कठोर भूमिका घेतली जाईल, पोलिस प्रशासनाला धारेवर धरले जाईल, ठोस निर्देश दिले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात दौर्यात चोरीला गेलेले अथवा गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्याचा कार्यक्रमच अधिक गाजला. त्यामुळे जनतेच्या मनात संतप्त प्रश्न निर्माण झाला आहे – पालकमंत्री जिल्ह्याचा आढावा घ्यायला आले होते की मोबाईल परत करण्याच्या सोहळ्यासाठी?
नांदेड शहरात गेल्या काही महिन्यांत कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न सातत्याने समोर येत आहेत. शहरासह ग्रामीण भागात मटका, जुगार, अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचे जाळे वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. अनेक भागांत पोलिसांचा धाक उरलेला नसल्याची भावना नागरिक खुलेपणाने व्यक्त करत आहेत. अशा वेळी पालकमंत्र्यांचा दौरा हा प्रशासनाला जागे करणारा ठरायला हवा होता. परंतु जनतेच्या मूलभूत अपेक्षांवर पाणी फेरत, केवळ दिखाऊ कार्यक्रमांना प्राधान्य दिल्याची चर्चा रंगली आहे. निश्चितच चोरीचे किंवा हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत देणे हे कौतुकास्पद कार्य आहे. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे अभिनंदन व्हायलाच हवे. परंतु प्रश्न एवढाच आहे की, हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा होता का की त्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती आवश्यक ठरावी? यापूर्वीही पोलिसांनी अशा अनेक मोहिमा राबवून मोबाईल परत केले आहेत. मग यावेळीच एवढा गाजावाजा का? कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांपासून लक्ष हटविण्याचा हा प्रयत्न तर नव्हता ना, असा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील अनेक भागांत रात्री नागरिक भयभीत वातावरणात जगत आहेत. महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत. वाहतूक शिस्त कोलमडलेली आहे. काही ठिकाणी टोळक्यांचा वावर वाढल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात जुगार अड्डे आणि मटका केंद्रे उघडपणे सुरू असल्याचे बोलले जाते. या सर्व प्रश्नांवर पालकमंत्र्यांनी पोलीस अधिकार्यांची कानउघाडणी करणे अपेक्षित होते. गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे आदेश देणे आवश्यक होते. परंतु तसे काही न घडता समारंभप्रधान कार्यक्रमाला महत्त्व दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी उसळली आहे. नांदेडकरांना दिखावा नको, ठोस कृती हवी आहे. मंचावर मोबाईल परत देऊन छायाचित्रे काढण्यापेक्षा रस्त्यावर गुन्हेगारी रोखणारी यंत्रणा मजबूत करणे अधिक गरजेचे आहे. पोलिसांनी स्वतःच्या कामाचा गाजावाजा करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे का? अवैध धंद्यांवर किती कारवाया झाल्या? प्रलंबित गुन्ह्यांचा तपास कुठपर्यंत पोहोचला? नागरिकांच्या तक्रारींना किती प्रतिसाद मिळतो? या प्रश्नांची उत्तरे जनतेला हवी आहेत. पालकमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ प्रोटोकॉल, बैठका आणि छायाचित्रांचा कार्यक्रम नसतो. तो प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. जर दौर्यांमधून केवळ प्रतिमा उभारणीचे प्रयोगच होत राहणार असतील, तर जनतेचा संताप आणखी वाढेल. नांदेडकरांना आता शब्द नव्हे, तर परिणाम दिसले पाहिजेत. अन्यथा पालकमंत्री आले आणि गेले, बदल मात्र काहीच झाला नाही, अशी भावना अधिक तीव्र होईल.

COMMENTS