Homeताज्या बातम्या

बीड एलसीबीची धडक कारवाई; मोटारसायकल चोर जेरबंद, 5 दुचाकी जप्त, 4 गुन्ह्यांची उकल

बीड : बीड जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका सराईत वाहनचोराला जेरबंद केले आहे

जंतर-मंतरवर पुन्हा वाढली आंदोलनाची धार; हजारो विद्यार्थी जमले एकत्र, पोलिसांचा मोठा ताफा तैनात
माऊली विद्यालय व आदर्श बालवाडीत गुरुपौर्णिमा साजरी; जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम विजेती आरोही घोलपचा सत्कार
बारामतीत अजितदादांच्या पुतळ्याचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण

बीड : बीड जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका सराईत वाहनचोराला जेरबंद केले आहे. या कारवाईत आरोपीकडून तब्बल 5 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत 2 लाख 60 हजार रुपये आहे. या कारवाईमुळे बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी विशेष पथकाची स्थापना करून वाहनचोरांचा शोध सुरू केला. दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी हे पथक गेवराई उपविभागात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जातेगाव रोड, गेवराई येथे एक व्यक्ती चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून संशयित मच्छिद्र बबन राठोड (रा. मानसिंगटांडा, ता. गेवराई) याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने मोटारसायकलबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने संबंधित मोटारसायकल चोरीची असल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याने आणखी चार मोटारसायकली वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण 5 मोटारसायकली जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची पडताळणी केली असता गेवराई पोलीस ठाणे (गु.र.नं. 439/2026), चकलांबा पोलीस ठाणे (गु.र.नं. 240/2026) तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिखलठाणा पोलीस ठाण्यातील (गु.र.नं. 157/2025 व 220/2025) असे एकूण चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. या सर्व गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटरमन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे तसेच पोलीस अंमलदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, युनुस बागवान, आनंद मस्के आणि सिद्धेश्वर मांजरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्रामीण भागात वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या धडक कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, वाहनचोरांमध्ये या कारवाईमुळे मोठा धाक निर्माण झाला आहे. पोलिसांनी वाहनचोरीविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

COMMENTS