बीड: पंतप्रधान आवास व रमाई घरकुल योजनेअंतर्गत बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप निर्भीड पत्रकार संघाचे पदाधिकार

बीड: पंतप्रधान आवास व रमाई घरकुल योजनेअंतर्गत बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप निर्भीड पत्रकार संघाचे पदाधिकारी किरण डोळस यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित इंजिनीयर, अधिकारी आणि कर्मचार्यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. डोळस यांनी दिलेल्या निवेदनानुसार, चौसाळा, बोरखेड, माळसजवळा, इट, मासापूर, चराटा, शिवणी, नेकनूर, मांजरसुंबा, लिंबागणेश, येळंब आणि घाटपिंपळनेर या गावांतील काही लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष घरकुल न बांधता योजनेतील अनुदानाचा अपहार केल्याचा आरोप आहे. या संदर्भात निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने माहितीच्या अधिकारातून माहिती मागविण्यात आली होती. मात्र पंचायत समितीकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत यापूर्वी तक्रारी व निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची 15 दिवसांच्या आत स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून संबंधित लाभार्थी, इंजिनीयर, अधिकारी व कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करावेत तसेच शासनाच्या निधीची वसुली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही आणि दोन दिवसांत चौकशी समिती स्थापन केली नाही, तर 14 ऑगस्टपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर निर्भीड पत्रकार संघ महिला आघाडीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा किरण डोळस यांनी दिला आहे.

COMMENTS