बीड : पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने ‘प्रोजेक्ट - वृक्षारोपण व

बीड : पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने ‘प्रोजेक्ट – वृक्षारोपण व संगोपन’ हा उपक्रम ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेअंतर्गत राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाजनवाडी, म्हाळस जवळा, मांजरसुंबा आणि नाथापूर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण ३५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या अभियानात विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि रोटरी क्लबचे सदस्य यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आईच्या नावाने एक झाड दत्तक देण्यात आले. प्रत्येक रोपावर संबंधित विद्यार्थ्याच्या आईच्या नावाचा टॅग लावून त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांकडे सोपविण्यात आली. उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच सर्वांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेत झाडांचे संरक्षण करण्याचा संकल्प केला. शाळा प्रशासनानेही लावलेल्या वृक्षांच्या नियमित संगोपनाची जबाबदारी स्वीकारत त्याबाबत वेळोवेळी प्रगती अहवाल देण्याचे आश्वासन दिले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने संबंधित गावांमध्ये जनजागृती करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांची निवड, स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि वृक्षलागवडीसोबत संगोपनावर दिलेला विशेष भर ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष सीए गोपाल लड्डा, सचिव सुहास बेदरे, प्रकल्प प्रमुख प्रा. अभय पटवारी आणि विवेक बडगे यांनी केली. विकास उमापूरकर व प्रमोद करमाळकर यांनी समन्वय, प्रत्यक्ष वृक्षारोपण आणि व्यवस्थापनात महत्त्वाचे योगदान दिले. ’झाड लावा, झाड जगवा’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवित विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे आणि हरित बीडच्या संकल्पनेला बळकटी देणारे हे अभियान ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

COMMENTS