बीड : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा महसूल दिन यंदा बीड जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला

बीड : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा महसूल दिन यंदा बीड जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ व ’राजस्व अभियान’ या जिल्हास्तरीय उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, विविध लोकप्रतिनिधी तसेच महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवार (दि. १ ऑगस्ट) रोजी सकाळी ११ वाजता पांगरी रोड येथील अंबिका लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर होते. विशेष निमंत्रित म्हणून डॉ. योगेश क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, परिविक्षाधीन आयएएस दिव्यांक गुप्ता, अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, सुनील शेरखाने, दीपक वजाळे, कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजपत्रित अधिकारी, महसूल अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कर्मचारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिवस्वराज्याच्या विचारांना अभिवादन करत महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रशासन आणि समाज यांनी समन्वयाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवचरित्रावर आधारित प्रेरणादायी पोवाड्याचे सादरीकरण झाले. पोवाड्याने उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमान आणि शिवस्वराज्याच्या विचारांबद्दल नवचैतन्य निर्माण केले.
कार्यक्रमादरम्यान महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध शासकीय योजनांतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, स्वामित्व सनद, विविध दाखले आणि शासकीय सेवांचा लाभ वितरित करण्यात आला. नागरिकांनी या लोकाभिमुख उपक्रमाचे स्वागत करत महसूल विभागाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांनी बदलत्या काळानुसार प्रशासनाने अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्याची आवश्यकता व्यक्त केली. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अशा समाधान शिबिरांची गरज असून, त्यामुळे शासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. योगेश क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचा आदर्श अधोरेखित करत, महाराजांनी उभारलेली न्याय्य महसूल व्यवस्था आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्याच विचारातून राबविण्यात येणारे ’महाराजस्व समाधान शिबीर’ प्रशासन अधिक संवेदनशील आणि नागरिकाभिमुख बनविणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी महसूल विभागातील डिजिटल सेवा, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धतीवर भर देत महसूल दिन हा प्रशासन आणि जनतेतील विश्वास दृढ करणारा दिवस असल्याचे सांगितले. प्रत्येक अधिकार्याने नागरिकांशी सुसंवाद साधून लोकाभिमुख प्रशासन उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले. अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांनी महसूल प्रशासन हे केवळ कागदोपत्री कामकाज नसून नागरिकांच्या विश्वासाशी जोडलेली सेवा असल्याचे सांगितले. अधिकारी व कर्मचार्यांनी नागरिकांचे प्रश्न वेळेत आणि नियमांनुसार सोडवून त्यांचा विश्वास संपादन करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या अभियानामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, नागरिकांना महसुली कामांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी तातडीने निकाली निघाव्यात आणि विविध विभागांच्या सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे.
या शिबिरात सातबारा उतार्यावरील त्रुटी दुरुस्ती, फेरफार नोंदी, वारस नोंदी, ई-मोजणी मार्गदर्शन, शेतकरी व महिला शेतकरी प्रमाणपत्रे, स्वामित्व सनद, विविध महसुली दाखले, ई-शिधापत्रिका, कृषिकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, जमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, ऑनलाइन महसुली सेवा तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध विभागांच्या अधिकार्यांनी दिवसभर नागरिकांच्या तक्रारी ऐकून अनेक प्रकरणांवर जागेवरच कार्यवाही केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले. मान्यवरांचे स्वागत, प्रेरणादायी पोवाडा, लाभार्थी सन्मान, अधिकारी-कर्मचारी गौरव आणि मार्गदर्शनपर भाषणांमुळे संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुहास हजारे, प्रशांत जाधवर, अण्णासाहेब वंजारे, संभाजी थोटे, पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रशांत सुपेकर, तालुका कृषी अधिकारी अविनाश साळी, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, कोतवाल, सेवा केंद्र चालक तसेच महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचार्यांनी अनेक दिवस नियोजनपूर्वक परिश्रम घेतले.
महसूल दिन हा केवळ एका विभागाचा औपचारिक कार्यक्रम नसून शासन आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करणारा उपक्रम असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. ’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आणि ’राजस्व अभियान’ यांच्या माध्यमातून लोकाभिमुख, पारदर्शक, संवेदनशील आणि गतिमान प्रशासनाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला. कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महसूल विभागावरील नागरिकांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

COMMENTS