बीड : बीड शहरातील चांदणेवाडा येथे गेल्या ४४ वर्षांपासून सुरू असलेला साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव महोत्सव यंदाही सामाजिक समता, संविधा

बीड : बीड शहरातील चांदणेवाडा येथे गेल्या ४४ वर्षांपासून सुरू असलेला साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव महोत्सव यंदाही सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि परिवर्तनाचा संदेश देत उत्साहात पार पडला. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या संकल्पनेतून आयोजित या महोत्सवात विविध सामाजिक उपक्रम, भव्य रॅली आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
महोत्सवादरम्यान समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. सुमारे एक हजार महिलांनी पंचशील फेटे परिधान करून भव्य रॅलीत सहभाग नोंदवला. सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांबाबत जनजागृती करणारा ’आरक्षण उपवर्गीकरण सामाजिक न्याय रथ’ हा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी भव्य साहित्य रॅलीही काढण्यात आली.
अभिवादन सभेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्याची माहिती देत पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीही पुतळा उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अजिंक्य चांदणे यांनी अध्यक्षीय भाषणात राज्य शासनाला “मुख्यमंत्री साहेब, आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू करा,” अशी थेट मागणी केली. संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महोत्सवाला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, प्रा. प्रदीप रोडे, भारत कांबळे, स्वप्नील गलधर, प्रेमलता चांदणे, ज्योतीताई मेटे, कल्याण आखाडे, सुशीलाताई मोराळे, अशोक लोढा, उत्तम पवार, सतीश कापसे, नाना मस्के, सुनील पाटोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रॅलीची सांगता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभेने झाली. यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा, संघर्षाचा आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष लोणके यांनी केले, तर सूत्रसंचालन सुधाकर धुरंधरे यांनी केले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ अखंड सुरू असलेला हा गौरव महोत्सव बीडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील प्रेरणादायी परंपरा म्हणून ओळखला जात आहे.

COMMENTS