नांदेड शहरातील खंडित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावरून पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन स्तरावर बैठका झाल्यानंतर महावितरण काही दिवस तरी जागे झाले,

नांदेड शहरातील खंडित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावरून पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन स्तरावर बैठका झाल्यानंतर महावितरण काही दिवस तरी जागे झाले, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. सलग दोन-तीन दिवस तुलनेने सुरळीत वीजपुरवठा झाल्याने जनतेला दिलासा मिळाला. मात्र, ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. म्हणतात ना – चार दिवसांची चांदणी, पुन्हा अंधारच अंधार! अगदी त्याचप्रमाणे पुन्हा शहरातील अनेक भागांत विजेचा लपंडाव सुरू झाला असून नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
शहरात तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला असताना तासन्तास वीज गायब होत असल्याने घराघरांत त्रासाचे वातावरण आहे. पंखे बंद, पाणीपुरवठा विस्कळीत, इन्व्हर्टर निकामी आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व रुग्णांचे हाल सुरू आहेत. अनेक भागांत दिवसभरात वारंवार वीज खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही ठिकाणी रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा बंद राहत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. याच काळात राजकीय पातळीवर मात्र श्रेयवादाचा तमाशा रंगला आहे. शहरातील पिरबु-हान भागात प्रस्तावित 33 केव्ही वीज उपकेंद्रासाठी जागेचा प्रश्न सुटल्याचे सांगत महापौर कविता मुळे यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकातून केला. त्यानंतर राजकीय वातावरण तापले. दुसरीकडे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी यापूर्वीच आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हे उपकेंद्र मंजूर करून घेतल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता या उपकेंद्राचे श्रेय नेमके कुणाचे, यावरून भाजपा आणि शिवसेनेत नवा संघर्ष उभा राहिला आहे. महापालिकेत सत्तेसाठी एकत्र आलेले भाजपा आणि शिवसेना नेते जनतेच्या प्रश्नांवर मात्र वेगवेगळे सूर लावत असल्याचे दिसत आहे. विकासकामे प्रत्यक्षात पूर्ण होण्यापूर्वीच श्रेयाची फित कापण्याची घाई लागल्याने नागरिक नाराज आहेत. महावितरणकडून स्मार्ट मीटर मोहिमा, वसुली मोहीम आणि नियमांची कडक अंमलबजावणी केली जाते; मात्र अखंडित वीजपुरवठ्याच्या मूलभूत जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून होत आहे.
नागरिकांचा थेट सवाल उपकेंद्राचे श्रेय नंतर घ्या-आधी वीज द्या!
शहरातील नागरिकांचे स्पष्ट मत आहे की, 33 केव्ही उपकेंद्र प्रत्यक्षात उभे राहून वीजपुरवठा सुधारला तरच श्रेयाला अर्थ आहे. तोपर्यंत घोषणा, दावे आणि प्रसिद्धीपत्रके यांना किंमत नाही. उन्हाळ्यात अंधारात बसलेल्या जनतेला राजकारण नव्हे, तर वीज हवी आहे.

COMMENTS