Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समन्वय हरवलेल्या सत्ताकेंद्रात महापौरांचा एकतर्फी कारभार ; नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी

वाघाळा महानगरपालिकेतील सत्ताकेंद्रात समन्वयाचा अभाव, निर्णय प्रक्रियेत वाढती एकतर्फी शैली आणि रखडलेली विकासकामे यामुळे महापालिकेच्या कारभारावर गं

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ : मूल्यमापन समितीवर पत्रकार गोविंद टेकाळे यांची निवड
विष्णुपुरीत मुबलक जलसाठा; नांदेडवरील पाणीटंचाईचे संकट टळले
माहूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच विमा रक्कम जमा होणार-आ.केराम


वाघाळा महानगरपालिकेतील सत्ताकेंद्रात समन्वयाचा अभाव, निर्णय प्रक्रियेत वाढती एकतर्फी शैली आणि रखडलेली विकासकामे यामुळे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापौर कविता संतोष मुळे यांच्या नेतृत्वशैलीबाबत सत्ताधारी वर्तुळातच कुजबुज सुरू असून, सामूहिक नेतृत्वाऐवजी केंद्रीकृत कारभार अशी टीका राजकीय स्तरावर व्यक्त होत आहे.
महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मोठ्या अपेक्षेने जाहीर करण्यात आलेला शंभर दिवसांचा कृती आराखडा प्रत्यक्षात अपेक्षित गतीने पुढे सरकताना दिसत नाही. अनेक प्रभागांतील मूलभूत प्रश्न जैसे थे असून, प्रत्यक्ष कामांपेक्षा पाहणी दौरे, बैठकांचे छायाचित्रण आणि प्रसिद्धीपर उपक्रमांवर अधिक भर दिला जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळे घोषणाबाजी आणि वास्तव यात दरी वाढत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अलीकडेच महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेबाबत उपमहापौरांना पूर्वकल्पना नसल्याची बाब समोर आल्यानंतर सत्ताधारी व्यवस्थेतील विसंवाद उघड झाला होता. यानंतर अनेक पदाधिकार्‍यांना कार्यक्रमांची माहिती शेवटच्या क्षणी दिली जात असल्याचेही बोलले जात आहे. परिणामी, महापालिकेतील निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी वाढत आहे. प्रशासकीय कारभार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद असणे ही कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत गरज मानली जाते. मात्र नांदेड मनापेत अधिकार्‍यांचा प्रभाव वाढत चालल्याची भावना नगरसेवकांतून व्यक्त होत आहे. जनतेतून निवडून आलेल्या सदस्यांना दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे लोकशाही व्यवस्थेच्या आत्म्यावरच घाला बसत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असतानाही शहरातील अनेक मोठ्या नाल्यांची साफसफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. मागील वर्षी अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. स्वच्छतेच्या बाबतीतही अनेक भागांत निष्काळजीपणा दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. महापौरांच्या दौर्‍यांबाबतही राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिकार्‍यांकडून केवळ निवडक आणि वरवरची कामेच दाखवली जात असून, ज्या ठिकाणी कामे रखडली आहेत, अनियमिततेच्या तक्रारी आहेत किंवा गैरव्यवहाराचे आरोप आहेत, त्या भागांपासून नेतृत्वाला दूर ठेवले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वास्तव परिस्थितीपर्यंत नेतृत्व पोहोचत नसल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच झालेल्या काही महापालिका कार्यक्रमांत समिती सदस्य आणि नगरसेवकांची अनुपस्थितीही लक्षवेधी ठरली. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कार्यक्रम राबवले जात असल्याने सहभाग घटत चालल्याची नोंद राजकीय निरीक्षक घेत आहेत. महापालिकेत सध्या सत्तेचा केंद्रबिंदू आहे, पण दिशा नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक स्तरावर स्वतंत्र सत्ता केंद्रे तयार होत असून, एकसंघ नेतृत्वाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. यामुळे प्रशासन शिथिल, विकासकामे संथ आणि नागरिक त्रस्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी महापौरांनी प्रशासन, पदाधिकारी आणि नगरसेवक यांना एकत्र घेऊन सामूहिक नेतृत्वाची नवी दिशा द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. अन्यथा एकाकी नेतृत्व, विस्कळीत व्यवस्था हीच मनपाची ओळख ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  महापालिकेत सध्या गोंधळाचे वातावरण दिसून येत असून समन्वयाचा अभाव असल्यामुळे प्रशासन कोणाचेही ऐकत नाही अशा परिस्थितीमध्ये महापालिकेवर अंकुश लावण्याचे काम पक्षश्रेष्ठींना करावे लागणार असल्याचे नागरिक बोलत आहेत.

COMMENTS