Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

शेतकरी वेठीस धरून कृषी सेवा केंद्रचालकांचा बंदनांदेड जिल्ह्यात बेमुदत आंदोलनाला सुरुवात

खरीप हंगामाची चाहूल लागत असतानाच नांदेड जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रचालकांनी सोमवारी बेमुदत आंदोलन सुरू केल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वाताव

चार दिवसांची चांदणी… पुन्हा शहरात अंधारच अंधार!श्रेयवादात नेते व्यस्त; 43 अंश तापमानात नागरिकांचा जीव मेटाकुटीला
समन्वय हरवलेल्या सत्ताकेंद्रात महापौरांचा एकतर्फी कारभार ; नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ : मूल्यमापन समितीवर पत्रकार गोविंद टेकाळे यांची निवड



खरीप हंगामाची चाहूल लागत असतानाच नांदेड जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रचालकांनी सोमवारी बेमुदत आंदोलन सुरू केल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रासायनिक खते, बियाणे व कीडनाशकांच्या विक्रीशी संबंधित विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांचे शटर खाली राहिले. परिणामी शेतीपूर्व तयारीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टीसाईड्स सीड्स डिलर असोसिएशन या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कंपन्यांकडून खतांचा पुरवठा करताना होत असलेले ‘लिंकींग’ तात्काळ बंद करावे, तपासणीत बियाणे किंवा खत निकृष्ट आढळल्यास विक्रेत्यांना आरोपी न ठरवता साक्षीदाराचा दर्जा द्यावा, तपासणी अधिकार्‍यांची संख्या वाढविणारी अधिसूचना मागे घ्यावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या आहेत. आंदोलनामुळे अनेक तालुक्यांतील कृषी सेवा केंद्र बंद राहिल्याने शेतकरी सकाळपासून दुकानांसमोर येत राहिले; मात्र निराश होऊन परतावे लागले. काही ठिकाणी बियाणे व खतांसाठी आधीच टंचाईची चर्चा असताना या बंदमुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीपपूर्व नियोजनाच्या निर्णायक काळात पुरवठा व्यवस्था विस्कळीत झाल्यास त्याचा थेट परिणाम पेरणीवर होऊ शकतो, अशी भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या बंदवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते प्रकाश मारावार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. शेतकर्‍यांना अडचणीत टाकून व्यापारी वर्ग स्वतःचे हित जपत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘लिंकींग’चा मुद्दा पुढे करून शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून, नफेखोर मानसिकतेतून हा बंद पुकारण्यात आला आहे, अशी टीका त्यांनी केली. प्रशासनाने काही व्यापार्‍यांना नोटिसा बजावल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या हंगामी गरजा लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बंद मागे घ्यावा, पुरवठा सुरळीत करावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून पुढे येत आहे. आता कृषी सेवा केंद्रचालक आणि प्रशासन यांच्यात तोडगा निघतो की संघर्ष अधिक तीव्र होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS