नांदेड महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पीय सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गोटातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागल्याची चर्चा महापालिका वर

नांदेड महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पीय सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गोटातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. महापौर कविता मुळे आणि उपमहापौर दिपक सिंग रावत यांच्यातील समन्वय बिघडल्याच्या चर्चांना नव्या घडामोडींमुळे अधिकच खतपाणी मिळाले आहे. सत्ताकेंद्रात सुरू असलेल्या या कथित संघर्षामुळे आगामी अर्थसंकल्पीय सभेवर राजकीय सावट निर्माण झाले आहे.
महानगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची अर्थसंकल्पीय सभा येत्या 30 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता शंकरराव चव्हाण सभागृहात बोलाविण्यात आली आहे. या सभेत सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक तसेच 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक मंजुरीसाठी मांडले जाणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील सूचना व विषयपत्रिका नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांनी जारी केल्याचे समजते. मात्र, शहराच्या आर्थिक दिशेला आकार देणार्या इतक्या महत्त्वाच्या सभेबाबत उपमहापौरांना वेळेवर कल्पना देण्यात आली नाही, अशी जोरदार चर्चा महापालिकेत सुरू आहे. सामान्यतः महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्या चर्चेनंतरच अशा बैठकींचे वेळापत्रक निश्चित केले जाते. परंतु यावेळी ती परंपरा डावलून निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पातळीवर समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. महापालिकेतील सूत्रांच्या मते, मागील काही महिन्यांपासून निर्णय प्रक्रियेत उपमहापौरांना दुय्यम स्थान दिले जात असल्याची नाराजी वाढत आहे. अनेक प्रशासकीय प्रस्ताव, समितीस्तरीय हालचाली आणि राजकीय निर्णय यामध्ये त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची कुजबुज सातत्याने ऐकू येत आहे. त्यामुळे आतापर्यंत बंद दाराआड असलेली नाराजी आता अर्थसंकल्पीय सभेच्या निमित्ताने उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे. उपमहापौर दिपकसिंग रावत हे विविध प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडणारे पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. प्रशासनातील त्रुटी, विकासकामांचा वेग, निधीवाटप आणि प्रलंबित प्रश्नांवर ते स्पष्ट भूमिका घेत असल्यामुळे काही निर्णय प्रक्रियेत त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा रंगली आहे. सत्तेतीलच एका गटाला त्यांची स्पष्टवक्तेपणा अस्वस्थ करत असल्याचेही बोलले जात आहे. महापालिकेतील सत्ताकेंद्रात दोन सत्तारेषा निर्माण झाल्याचे चित्र आता स्पष्ट होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. एका बाजूला अधिकृत नेतृत्व, तर दुसर्या बाजूला स्वतंत्र भूमिका घेणारे उपमहापौर, अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा थेट परिणाम सभागृहातील कामकाजावर होऊ शकतो. अर्थसंकल्पासारख्या संवेदनशील विषयावर पदाधिकार्यांमध्ये मतैक्य नसल्यास प्रशासनालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, विरोधकांनीही या घडामोडींवर लक्ष केंद्रीत केले असून सत्ताधार्यांतील विसंवादाचा मुद्दा सभागृहात गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहर विकास, कररचना, निधीवाटप, प्रलंबित कामे आणि नव्या तरतुदींवर चर्चा होण्याऐवजी अंतर्गत संघर्षच केंद्रस्थानी राहिला, तर त्याचा फटका नागरिकांना बसू शकतो. महापौर आणि उपमहापौर यांच्यात नेमका कोणत्या मुद्द्यावरून दुरावा निर्माण झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी महापालिकेतील वातावरण मात्र तापलेले दिसत आहे. आगामी अर्थसंकल्पीय सभेत हे मतभेद उघडपणे समोर येतात का, की शेवटच्या क्षणी समझोता होतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
………………..चौकट………
सर्वांनी एकत्रित बसूनच अर्थसंकल्पीय सभेची तारीख निश्चित केली होती. बहुधा उपमहापौर अर्थसंकल्पीय सभेची तारीख विसरले असावेत असे वाटते. उपमहापौर व महापौर यांच्यात कोणतेच वाद किंवा विसंवाद नाही.
– महापौर कविता मुळे

COMMENTS