लोणी : शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व असून बदलत्या हवामान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधारित दुग्ध व्यवसा

लोणी : शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व असून बदलत्या हवामान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधारित दुग्ध व्यवसायाची गरज वाढली आहे. पशुसंवर्धन सखींनी केवळ दूध उत्पादनापुरते मर्यादित न राहता प्रक्रिया उद्योगातून व्यवसायवृद्धी साधावी, असे प्रतिपादन बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. विठ्ठल विखे यांनी केले.पायरेन्सच्या कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, पशुसंवर्धन विभाग आणि डिजिटल ग्रीन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पशुसखी, पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी आणि शेतकरी महिलांसाठी आयोजित एक दिवसीय दुग्ध व्यवसाय कार्यशाळेत ते बोलत होते.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर तसेच प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ. विठ्ठल विखे म्हणाले की, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून महिलांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून दुग्ध व्यवसायाकडे पाहण्याची गरज आहे. कमी कष्टातून अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी दुग्ध उत्पादनातील विविध कौशल्ये व नवतंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.प्रशांत कुलकर्णी यांनी दुधाळ गाई-म्हशींचे फायदेशीर व्यवस्थापन तसेच वासरू ते गाय समग्र व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. डॉ. पराग घोंगळे यांनी पशुआहार व टोटल मिक्स राशन, तर डॉ. प्रशांत योगी यांनी पशु आयुर्वेद आणि पशु होमिओपॅथी यावर मार्गदर्शन केले. डॉ. निलेश खाडे यांनी जनावरांमधील प्रयोगशाळा तपासणी, दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्र आणि प्रक्रिया उद्योग याविषयी माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अमृता दास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस राहाता तालुक्यातील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यशाळेत एकूण ६० प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गृह विज्ञान विभागाच्या संज्जला लांडगे यांनी मानले.

COMMENTS