कोपरगाव: शारीरिक अपंगत्वावर मात करून दिव्यांगांना स्वाभिमानाने व स्वावलंबी जीवन जगता यावे, या उद्देशाने श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती (म

कोपरगाव: शारीरिक अपंगत्वावर मात करून दिव्यांगांना स्वाभिमानाने व स्वावलंबी जीवन जगता यावे, या उद्देशाने श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती (मुंबई), राष्ट्रीय शेअर बाजार प्रतिष्ठान आणि आमदार आशुतोष काळे यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांगांसाठी दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. २५) सकाळी नऊ वाजता दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, शुक्रवारी (दि. २६) मोफत कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली.
महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन धर्मादाय संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या या शिबिरात अत्याधुनिक कृत्रिम अवयव, पोलिओग्रस्तांसाठी आधारपट्टे, फिरण्यासाठी चाकांची खुर्ची, तीन चाकी सायकल, कुबड्या, चालण्यासाठी आधार चौकट तसेच श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी आधुनिक श्रवणयंत्रे यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक दिव्यांगांना महागडे कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने घेणे शक्य होत नसल्याने त्यांना दैनंदिन जीवनात दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात सहभागी होणाऱ्या दिव्यांगांची गुरुवारी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली जाईल आणि त्यानुसार आवश्यक साहित्याचे वितरण शुक्रवारी केले जाणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी आधारकार्ड, शासकीय दिव्यांग प्रमाणपत्र, एकात्मिक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) तसेच पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे सोबत आणणे आवश्यक आहे. कोपरगाव मतदारसंघातील गरजू दिव्यांगांनी वेळेत उपस्थित राहून या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

COMMENTS