देवळाली प्रवरा: मुसमाडे वस्ती जवळील काळे वस्ती येथे वीजवाहक तार तुटून गोठ्यावर पडल्याने ८ गायी मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुप

देवळाली प्रवरा: मुसमाडे वस्ती जवळील काळे वस्ती येथे वीजवाहक तार तुटून गोठ्यावर पडल्याने ८ गायी मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाख त्रिंबकपूर शिवेलगत असलेल्या काळे वस्ती येथे मच्छींद्र बापू काळे व गणेश काळे यांच्या गोठ्यावर दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. परिसरात काळे ढग दाटून येऊन रिमझिम पाऊस सुरू असताना रोहित्रावरून जाणारी वीजवाहक तार अचानक तुटून गोठ्याच्या शेडवर पडली. तार पडताच गोठ्यात तीव्र वीजप्रवाह पसरला आणि गोठ्यातील ८ गायींचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महावितरणकडून वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला, मात्र तोपर्यंत जनावरांचे मोठे नुकसान झाले होते.
या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. महावितरणाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महावितरण आणि प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रशांत मुसमाडे यांनी केली आहे. तसेच प्रशासनाने त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

COMMENTS