संशयास्पद कारमधून १२ लाख ४० हजारांच्या नोटा जप्त; एकास अटक संगमनेर : शहरात बनावट नोटांचा व्यवहार सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी केलेल्या
संशयास्पद कारमधून १२ लाख ४० हजारांच्या नोटा जप्त; एकास अटक
संगमनेर : शहरात बनावट नोटांचा व्यवहार सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ लाख ४० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. संशयास्पद कारचा पाठलाग करून पोलिसांनी मयूर किशोर सिद्धपुरा याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील आणखी दोन ते तीन संशयितांचा शोध सुरू आहे.
संगमनेर शहरात भरधाव वेगाने जाणाऱ्या संशयास्पद कारची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारचा पाठलाग करून ती अडवली. कारची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी मयूर सिद्धपुरा याला ताब्यात घेत नोटा जप्त केल्या.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बनावट नोटा खऱ्या नोटांमध्ये मिसळून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. नोटांच्या बंडलाच्या वर आणि खाली खरी नोट ठेवून त्यामध्ये बनावट नोटा ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे व्यवहारादरम्यान सहजासहजी संशय येऊ नये, असा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
या बनावट नोटा संगमनेरमधील एका व्यक्तीला देण्यासाठी आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, बनावट नोटांच्या या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच या नोटांचा पुरवठा कुठून करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS