लोहगड किल्ल्यावर सिया गोयलने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची (केतन अग्रवाल) केलेली हत्या असेल किंवा मग देशात इतरत्र नववधू अथवा जोडीदाराने केलेल्या हत्या

लोहगड किल्ल्यावर सिया गोयलने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची (केतन अग्रवाल) केलेली हत्या असेल किंवा मग देशात इतरत्र नववधू अथवा जोडीदाराने केलेल्या हत्यांचा पालकांनी आता चांगलाच धसका घेतला आहे. खासकरून अरेंज मॅरेज करताना भावी जोडीदाराची संपूर्ण कुंडलीच आपल्याला माहीत असावी, या दृष्टीने पालकांचा खासगी गुप्तहेरांकडे (Private Detective) कल लक्षणीयरीत्या वाढला आहे.
जोडीदारावर पाळत ठेवून त्याचे चारित्र्य, त्याला कसलं व्यसन तर नाही ना, त्याची शैक्षणिक पात्रता, कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती, भावी जोडीदारावरील कर्जाचा डोंगर, त्याची प्रेमप्रकरणे किंवा अगदी लैंगिक कल जाणून घेण्यासाठी पालक लाखो रुपये खर्च करून खासगी गुप्तहेरांची मदत घेताना दिसून येत आहेत.
भीती कमी करण्यासाठी ‘ट्रस्ट व्हॅरिफिकेशन’वर भर गुप्तहेरांची मदत घेण्याचा विचार प्रामुख्याने उच्च मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय लोकांकडून केला जात आहे. मानसोपचारतज्ज्ञ निकिता सुळे यांच्या मते, एखादी गुन्हेगारी घटना घडल्यानंतर बातम्या आणि सोशल मीडियावर तिची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते व लहान-सहान गोष्टी हायलाइट होतात. त्यामुळे अशा घटना सामान्यपणे जास्त घडत असल्याचा भास होतो. ही भीती कमी करण्यासाठीच लोक ‘ट्रस्ट व्हॅरिफिकेशन’वर जास्त भर देत आहेत.
लग्न जुळवताना प्रायव्हेट डिटेक्टिव्हची भूमिका का वाढली?
- कौटुंबिक व चारित्र्य तपासणी: अरेंज मॅरेजपूर्वी भावी जोडीदाराचे चारित्र्य, व्यसन, मित्रपरिवार आणि उठबस याबद्दल गुपचूप तपासणी केली जात आहे.
- आर्थिक व शैक्षणिक पडताळणी: शैक्षणिक पात्रता, पगार, खरी आर्थिक परिस्थिती आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचा बोजा यांची खरी माहिती काढली जाते.
- पत्रिका जुळण्यापेक्षा पार्श्वभूमी महत्त्वाची: केवळ पत्रिका जुळणे पुरेसे नसून कुटुंबाचे वळण आणि सामाजिक पार्श्वभूमी तपासण्यावर भर दिला जात आहे.
- संशय आल्यास स्थळ रद्द: गुप्तहेरांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशय व्यक्त करताच पुढची बोलणी न करता थेट स्थळे नाकारली जात आहेत.

COMMENTS