प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांचा व आपल्या महापुरुषांचा जीवन संघर्ष, त्यांचे कष्ट, जिद्द व मेहनत आपण सदैव डोळ्यासमोर

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांचा व आपल्या महापुरुषांचा जीवन संघर्ष, त्यांचे कष्ट, जिद्द व मेहनत आपण सदैव डोळ्यासमोर ठेवून यशाच्या गावाला वाटचाल केली पाहिजे. म्हणजे आपल्याला जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्यांची निरंतर प्रेरणा व उर्जा मिळत राहील. त्यासाठी आपण शैक्षणिक आखाड्यात जिद्दीने व तयारीने पेटून उठून, अभ्यासाच्या नादी लागायला हवे. आपले आईवडील आपल्याला लहानाचे मोठे करतात. शाळेत व महाविद्यालयात शिकायला पाठवतात आणि आपल्या शिक्षणावर वारेमाप खर्च करतात. त्यांनाही वाटते की, माझा मुलगा खूप खूप शिकावा व शासनाच्या गादीवर बसावा. म्हणजे आपली प्रतिकूल परिस्थिती सुधारेल आणि आपल्यालाही एकदिवस सुखाचे दिवस येतील. म्हणून आईवडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप खूप खस्ता खातात. जीवाचे रान करतात. प्रसंगी सावकाराचे कर्ज काढून, आपल्या मुलाच्या शिक्षणाला पैसा लावतात. ज्या मुलांचे आईवडील शेतात कष्ट करून व घाम गाळून आपल्या पाल्यांना शैक्षणिक कामासाठी पैसा पुरवतात. त्या दाम्पत्याची मुलेही आपल्या आईवडिलांचा जीवन संघर्ष आपला प्रेरणादायी ठेवा मानतात. आणि ते सुद्धा आपल्या आईवडिलांचा आदर्श घेऊन सातत्याने अभ्यास व अभ्यासच करतात. आणि एक दिवस आपले नाव जगाच्या कानाकोपर्यात घेऊन जातात. खरे तर विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे कष्ट, मेहनत व अठरा विश्व दारिद्र्य डोळ्यासमोर ठेवून सातत्याने अभ्यास व चिंतन केले पाहिजे. म्हणजे आपल्याला जीवन ध्येय लिलया गाठता येते. आपल्या भारत देशात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालणारे जे कोणी महात्मे होऊन गेले. त्यांनी सर्व प्रथम आपल्या आईवडिलांचा जीवन लढा आपला आदर्श मानून आपले नाव सातासमुद्रापार नेले. उदाहरण द्यायचे झाले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देता येईल, कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अठरा विश्व दारिद्र्याची जाणीव होती. आईवडिलांचा, समाज बांधवांचा व पत्नी रमाई आंबेडकरांचा जीवन संघर्ष त्यांना माहीत होता. त्यांच्या पत्नी माता रमाई आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी शेणाच्या गोवर्या व लाकडाच्या मोळ्या विकून पैसा लावला. पण बाबासाहेबांनीही रमाईच्या कष्टांची व त्यागाची जाणीव ठेवली आणि पाठवलेला पैसा काटकसरीने वापरून त्या पैशाचे व रमाईच्या कष्टांचे चीज केले. आणि आपले नाव जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावे असे देदीप्यमान कार्य करून जगाला दाखवले. त्यांची भारतासह संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. म्हणजे माणसाला जर गरिबीतून मोठं व्हायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम आईवडिलांच्या जीवन संघर्षाची जाणीव असायला हवी. कारण आपल्याला जिद्दीने पेटून काम करण्याची प्रेरणा व उर्जा त्यांच्या कष्टातून मिळत राहते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना जीवनात मोठं व्हायचं असेल तर त्यांनी खूप काही करण्याची गरज नाही. फक्त आपल्या आईवडिलांचा जीवन संघर्ष डोळ्यासमोर ठेवून सातत्याने अभ्यास केला पाहिजे म्हणजे पुढे जाण्यासाठी आपल्याला आपोआप प्रेरणा मिळत राहील…
बुद्धभूषण कांबळे
मो : 7498715661


COMMENTS