Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मला समजलेले डॉ. बाबासाहेब आंंबेडकर !

दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आमच्या आयुष्यात एक वेगळाच आनंद सुरू व्हायचा. सुट्ट्या म्हणजे आजोळ, मोकळेपणा, प्रेम आणि संस्कार य

घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त ः राज्यपालचैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
डॉ. आंबेडकर यांना कोपरगावात राष्ट्रवादीकडून अभिवादन
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पाथर्डीत विविध उपक्रम

दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आमच्या आयुष्यात एक वेगळाच आनंद सुरू व्हायचा. सुट्ट्या म्हणजे आजोळ, मोकळेपणा, प्रेम आणि संस्कार यांचा सुंदर संगम. मी, माझा भाऊ आणि माझी लहान बहीण आम्ही तिघेही सुट्ट्या लागल्या की आजोबांच्या घरी जायचो आणि सुट्ट्या संपेपर्यंत तिथेच राहायचो.
आमच्या आजोळचा मोठा परिवार होता. मोठे मामा-मामी, छोटे मामा-मामी, मावशी, दोन आज्या आणि आजोबा. प्रत्येक जण आमच्यावर अपार प्रेम करायचा. मामा आमचा अभ्यास घ्यायचे, तर मामी रोज सकाळी प्रेमाने चहा-पोळी करून द्यायच्या. त्यांच्या हातचा साधा चहा-पोळीही आम्हाला अत्यंत आवडायचा. त्यासोबतच चिवडा, लाडू, खाऊ सगळे काही प्रेमाने तयार करून आम्हाला दिले जायचे. आमच्या दिवसाची सुरुवातही वेगळीच असायची. आम्ही अजून झोपेत असताना छोटा मामा बाबासाहेबांवरील गाणी लावायचा. त्या गाण्यांचा आवाज आमच्या कानावर पडताच आमची झोप हळूहळू उघडायची. सुरुवातीला मला कुतूहल वाटायचे – रोज हीच गाणी का? एकदा विचारल्यावर मामा म्हणाले, ही गाणी वामनदादा कर्डक यांची आहेत. त्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार गाण्यांतून केला. त्या दिवसापासून बाबासाहेबांविषयी माझ्या मनात एक वेगळी ओढ निर्माण झाली.
माझी मोठी आजी रोज सकाळी बुद्धांच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती लावायची, फुले अर्पण करायची आणि आम्हा सगळ्यांना घेऊन बुद्ध वंदना घ्यायची. त्या वंदनेतून शांतता, समता आणि करुणा यांची शिकवण मिळायची. आमच्या घरी एक वेगळीच परंपरा होती. हिंदू धर्मातील सण आम्ही साजरे करत नव्हतो. आमच्यासाठी दोनच सण महत्त्वाचे होते. 14 एप्रिल, बाबासाहेब जयंती आणि बुद्ध जयंती. आमच्यासाठी बाबासाहेब जयंतीच खरी दिवाळी होती. घरात साफसफाई, रंगकाम, नवीन कपडे, आनंद आणि उत्साह सगळं काही त्या दिवसाभोवती फिरायचं. लहान वयात माझ्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण व्हायचे. आपण मंदिरात का जात नाही? गणपती का बसवत नाही? आपण फक्त बाबासाहेब आणि गौतम बुद्धांनाच का मानतो? हे प्रश्‍न मी माझ्या मामा-मावशींना विचारले. त्यांनी मला संयमाने समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की भारतात एकेकाळी वर्णव्यवस्था होती. त्या व्यवस्थेमुळे समाजात प्रचंड भेदभाव आणि अन्याय निर्माण झाला होता.
खालच्या जातींना माणूस म्हणूनही जगण्याचा अधिकार नव्हता. त्यांना शिक्षण, पाणी, सन्मान काहीच मिळत नव्हते. बाबासाहेबांनी या अन्यायाविरुद्ध लढा देऊन आपल्याला समानतेचा आणि स्वाभिमानाचा हक्क मिळवून दिला. मी पुढे विचारले, मग गौतम बुद्धांनी काय केले? तेव्हा त्यांनी सांगितले की बाबासाहेबांनी सर्व धर्मांचा अभ्यास करून बुद्ध धम्म स्वीकारला, कारण तो माणुसकी, तर्क, विज्ञान आणि समतेवर आधारित आहे. प्रज्ञा, शील आणि करुणा या तत्त्वांवर आधारलेला हा जीवनमार्ग आहे. या सर्व गोष्टी ऐकून माझ्या मनात बाबासाहेबांविषयी आदर अधिकच वाढला. मी त्यांच्यावरील पुस्तके वाचायला सुरुवात केली. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष वाचताना डोळ्यात पाणी येत असे. शाळेत बाहेर बसून शिक्षण घेणे, पाणी न मिळणे, प्रवासात अपमान सहन करणे, या घटना मन हेलावून टाकणार्‍या होत्या.
14 एप्रिल जवळ आली की आमच्या घरात उत्सवाचे वातावरण निर्माण व्हायचे. घर सजवणे, नवीन कपडे घेणे, फराळ बनवणे, सगळीकडे आनंद पसरायचा. आजोबा नेहमी म्हणायचे बाबासाहेबांमुळे आपण सन्मानाने जगतो. माझे वडील कराटे प्रशिक्षक असून बुद्ध धम्माचा प्रसार करतात. त्यांच्या संपर्कात विविध जाती-धर्मातील विद्यार्थी येत. जयंतीच्या दिवशी ते सर्व आमच्या घरी येत, बाबासाहेबांना अभिवादन करत आणि एकत्र बसून जेवण घेत. त्या वातावरणात खरी समता आणि बंधुता अनुभवायला मिळायची. आमच्या वस्तीमध्ये जयंतीच्या दिवशी निळे झेंडे, रोषणाई, ढोल-ताशे, लेझीम आणि भव्य मिरवणुका निघायच्या. जय भीमच्या घोषणांनी वातावरण भारून जायचे. त्या दिवशी सगळे एकमेकांना जय भीम म्हणून अभिवादन करत. तो फक्त शब्द नव्हता, तर विचारांचा सन्मान होता. एकदा मी विचारले, आपला झेंडा निळाच का? तेव्हा मला सांगितले गेले की निळा रंग आकाशाचा आणि पाण्याचा – म्हणजे सर्वांसाठी समान. म्हणून तो समतेचे प्रतीक आहे.
माझ्या आजोबांनी आम्हाला काळाराम मंदिर, येवला आणि भीमा-कोरेगाव यांसारखी ऐतिहासिक स्थळे दाखवली. त्या ठिकाणांमधून बाबासाहेबांच्या संघर्षाची जाणीव अधिक स्पष्ट झाली. आमच्या घरात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. एक वेळ जेवण कमी चालेल, पण पुस्तक नवीनच घ्यायचे, हा आमचा संस्कार आहे. लहानपणापासून आम्हाला बाबासाहेबांसारखे शिकण्याची प्रेरणा दिली गेली. आज मला कळते की आरक्षण आणि शिष्यवृत्ती या केवळ योजना नाहीत, तर सामाजिक न्यायाची साधने आहेत. त्यामुळंच अनेकांना शिक्षणाची आणि प्रगतीची संधी मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी काम केले. महिलांना अधिकार मिळवून दिले, अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला आणि समतेचा मार्ग दाखवला. आज आपण जे काही आहोत, ते त्यांच्या संघर्षामुळेच शक्य झाले आहे. त्यांच्या विचारांमुळेच आपण मोकळ्या श्‍वासाने, स्वाभिमानाने जगू शकतो. बाबासाहेब हे नाव घेताच अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या त्यागाची आठवण झाली की डोळ्यांसमोर त्यांचे संपूर्ण जीवन उभे राहते. आमच्या प्रत्येक श्‍वासात बाबासाहेब आहेत. त्यांचे उपकार आम्ही कधीही फेडू शकणार नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत आम्ही त्यांच्या ऋणात राहू.
धन्यवाद, बाबासाहेब!

॥ जय भीम ॥
डॉ. शितल अशोक तीनगोटे
छत्रपती संभाजीनगर

COMMENTS