Homeताज्या बातम्या

जूननंतरच चित्र स्पष्ट! चिखलीकर, आष्टीकर, सुमठाणकर, जवळगावकर ; विरोधकांचा अंतिम उमेदवार कोण?

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना अधिकृत उमेदवारी ज

विधान परिषदेच्या रणांगणात ‘टोकन’ची चर्चा; 452 मतदारांभोवती फिरतेय कोट्यवधींची राजकीय गणिते!निवडणूक प्रचारापेक्षा ‘मतदार व्यवस्थापन’च अधिक चर्चेत; सहली, रिसॉर्ट्स आणि आमिषांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले
निवडणूक आली की आमदार हेमंत पाटील व आमदार चिखलीकर विसंवादी सुर का लावतात?महापालिकेत महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा द्यायचा, इतर निवडणुकात मात्र विरोध का?
राजकीय रंगमंचावर मैत्रीचे सूर; संगीत संध्येत विरोधकांच्या गप्पांची रंगली मैफल


नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. मात्र, अमरनाथ राजूरकर यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदवार रिंगणात राहणार याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम असून 4 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
विरोधी पक्षांच्या गोटात सध्या अनेक नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर, काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर तसेच माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आली आहेत. मात्र यापैकी एकच उमेदवार सर्वपक्षीय विरोधकांच्या वतीने अधिकृतपणे मैदानात राहणार की एखादा अपक्ष उमेदवार निवडणुकीत रंगत वाढविणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या विरोधी पक्षांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अद्याप अंतिम एकमत झाले नसल्याची चर्चा असून, भाजपाविरोधात एकच उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. विरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय गणिते मांडली जात असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्येच्या आधारावर भाजपाकडे मजबूत मतांची बेरीज असल्याचे मानले जात आहे. पक्षाच्या रणनीतीनुसार 300 पेक्षा अधिक मते मिळविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असून सर्वच पक्षांकडून मतदारांशी संपर्क वाढविण्यात आला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य घोडेबाजार आणि आर्थिक व्यवहारांच्या चर्चांनाही उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे उमेदवार निश्चित झाल्यानंतर राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध पक्षांचे पदाधिकारी आणि प्रभावशाली नेते मतदारांशी संपर्क साधत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. 4 जून रोजी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. त्यानंतरच ही निवडणूक सरळ लढत ठरणार की बहुरंगी होणार, हे स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र नांदेडच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चिला जात आहे-अमरनाथ राजूरकर यांच्या विरोधात अखेर चिखलीकर, आष्टीकर, सुमठाणकर, जवळगावकर यांच्यापैकी कोण मैदानात राहणार? आगामी दोन दिवसांतील राजकीय घडामोडी या निवडणुकीचे संपूर्ण समीकरण बदलू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे 4 जूननंतर नांदेड विधान परिषद निवडणुकीला खर्‍या अर्थाने रंग चढणार, यात शंका नाही. नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये विरोधकांच्या गटामध्ये ऐक्य निर्माण होते का व सर्वपक्षीय एकच उमेदवार सर्व संमतीने ठरतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

COMMENTS