नांदेड : राजकारणात कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. या उक्तीचा प्रत्यय सोमवारी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संगीत संध

नांदेड : राजकारणात कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. या उक्तीचा प्रत्यय सोमवारी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संगीत संध्येच्या कार्यक्रमात आला. एका बाजूला विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण तापलेले असताना दुसर्या बाजूला गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल मैफलीत विविध पक्षांचे नेते राजकीय मतभेद बाजूला ठेवून दिलखुलास गप्पांमध्ये रमल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सोमवार, 1 जून हा नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. सकाळी भाजपाचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दिवसभर राजकीय हालचालींना वेग असताना रात्री आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित संगीत संध्या कार्यक्रमात राजकीय वातावरणाला वेगळाच रंग चढला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर, विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत तसेच आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांविरोधात राजकीय भूमिका घेणारे नेते यावेळी एकाच रांगेत बसून मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू असतानाच अमरनाथ राजूरकर आणि हेमंत पाटील यांच्यातील निवांत संवाद अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला. महायुतीतील काही घटक पक्ष भाजपाविरोधात भूमिका घेतील, विरोधक एकत्र येतील, अशा चर्चांना उधाण आलेले असतानाच या नेत्यांच्या मैत्रीपूर्ण संवादाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, बाहेर पावसाच्या सरी बरसत होत्या आणि सभागृहात राहुल देशपांडे यांच्या सुरांनी वातावरण भारावून गेले होते. त्याचवेळी राजकीय मतभेद विसरून नेतेमंडळी एकत्र बसून गप्पा मारत असल्याचे दृश्य राजकीय संस्कृतीचा सकारात्मक संदेश देणारे ठरले. निवडणुका येतात-जातात, राजकीय भूमिका बदलतात; मात्र वैयक्तिक संबंध आणि परस्पर सन्मान टिकून राहणे हे लोकशाहीच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे, हे या संगीत संध्येने अधोरेखित केले.

COMMENTS