मुंबई : देशातील महत्त्वाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि ज्ञानपरंपरेच्या जतनासाठी ओळखल्या जाणार्या एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणु
मुंबई : देशातील महत्त्वाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि ज्ञानपरंपरेच्या जतनासाठी ओळखल्या जाणार्या एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील ‘एशियाटिक टुमॉरो’ गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, छाननी समिती आणि व्यवस्थापन समितीच्या सर्व प्रमुख जागांवर या गटाच्या उमेदवारांनी यश संपादन केल्याने संस्थेच्या भावी वाटचालीत नवे बदल घडण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी एकूण 506 मतदानांपैकी 349 मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना 157 मते मिळाली. या निकालामुळे सोसायटीच्या नेतृत्वाची धुरा आता नव्या गटाकडे पूर्णपणे सोपविण्यात आली आहे. सचिवपदाच्या निवडणुकीत विवेक गणपुले यांनी 353 मते मिळवून विजय नोंदविला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सी. एम. पौळ यांना 149 मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या चारही जागांवर चंद्रप्रकाश द्विवेदी, नितीश भारद्वाज, रमेश पतंगे आणि संजय देशमुख यांनी विजय मिळवत गटाचे वर्चस्व अधिक दृढ केले. याशिवाय छाननी समितीच्या सातही जागा आणि व्यवस्थापन समितीच्या सहाही जागांवरही ‘एशियाटिक टुमॉरो’ गटाच्या उमेदवारांनी यश मिळवले. त्यामुळे संस्थेच्या निर्णयप्रक्रियेत आणि प्रशासनात या गटाची प्रभावी भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीपूर्वी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी या गटाला सार्वजनिक पाठिंबा दिला होता. एशियाटिक सोसायटीसमोरील आर्थिक, प्रशासकीय आणि सांस्कृतिक आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता या नेतृत्वाकडे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. संस्थेच्या जतनासोबतच तिचे आधुनिकीकरण, संशोधनवृद्धी आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी नवे उपक्रम राबविण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली होती. पाठिंबा देणार्या मान्यवरांमध्ये संस्कृत व प्राच्यविद्येचे अभ्यासक डॉ. सिद्धू डांगे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, लेखक अमीष त्रिपाठी, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. मनोजकुमार तिवारी, उद्योगक्षेत्रातील मिलिंद कांबळे, माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. हरीश पाठक, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि अभिनेते मनोज जोशी यांचा समावेश होता. दरम्यान, निवडणुकीतील कमी मतदानानेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. सुमारे दोन हजार पाचशे तीस सदस्य मतदानासाठी पात्र असताना केवळ 506 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच एकूण मतदारांपैकी अवघ्या वीस टक्के सदस्यांनीच निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. इतक्या कमी मतदानानंतरही एका गटाने सर्वच स्तरांवर निर्विवाद विजय मिळवणे ही या निवडणुकीची विशेष बाब ठरली.
नव्या पिढीला संस्थेसोबत जोडण्याचे नवे आव्हान
तज्ज्ञांच्या मते, एशियाटिक सोसायटीसारख्या ऐतिहासिक संस्थेसमोर वारसा संवर्धन, दुर्मीळ ग्रंथसंपदेचे जतन, संशोधनाला चालना आणि नव्या पिढीला संस्थेशी जोडण्याचे मोठे आव्हान आहे. नव्या नेतृत्वाकडून या सर्व क्षेत्रांत ठोस धोरणे आखली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एशियाटिक सोसायटी ही केवळ एक संस्था नसून देशाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक इतिहासाची जपणूक करणारे महत्त्वाचे केंद्र मानली जाते. त्यामुळे नव्या व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीकडे अभ्यासक, संशोधक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS