Homeताज्या बातम्या

लावणी कलाकारांना शासनाने अनुदान द्यावे; लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे: महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या लावणी कलेचे जतन करण्यासाठी लावणी कलाकारांना शासनाने आर्थिक मदत, मानधन आणि विविध कल्याणक

पेपरफुटीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीडमध्ये धरणे आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा- राजेंद्र मस्के
गोदावरीकाठी आजही उभा आहे राघोबादादा-आनंदीबाईंचा अपूर्ण महाल…! कोपरगावच्या ऐतिहासिक वैभवाची जिवंत साक्ष
मिनी बस दरीत कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू; राजगड परिसरातील पाबे घाटातील भीषण अपघात
Surekha Punekar Demands Grant For Lavani Artists; Says It Is Maharashtra  Pride

पुणे: महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या लावणी कलेचे जतन करण्यासाठी लावणी कलाकारांना शासनाने आर्थिक मदत, मानधन आणि विविध कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ज्येष्ठ लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांनी केली आहे. लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकारांचे आर्थिक आणि सामाजिक संरक्षण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुरेखा पुणेकर यांनी सांगितले की, गेली चार दशके त्या लावणी कलेची सेवा करत आहेत. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या लोककलेला देशासह परदेशातही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, या कलेसाठी आयुष्य वेचणाऱ्या अनेक कलाकारांना आज आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, नियमित उत्पन्नाचा अभाव त्यांच्या जगण्याचा मोठा प्रश्न बनला आहे. शासन विविध क्षेत्रांसाठी अनुदान आणि कल्याणकारी योजना राबवत असते. मात्र, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या लावणी कलाकारांना अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ कलाकारांच्या उपजीविकेसाठी नियमित मानधन, आरोग्यविमा, वैद्यकीय सुविधा, निवृत्तीवेतन आणि अन्य सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या काळात पांढरपेशा समाजातील प्रेक्षक लावणीपासून दूर गेल्याचे निरीक्षणही त्यांनी व्यक्त केले. काही कार्यक्रमांमध्ये आलेल्या अश्लीलतेमुळे या कलेची प्रतिमा मलीन झाली असून, लावणीचे पारंपरिक, दर्जात्मक आणि संस्कारित स्वरूप जपणे आवश्यक आहे. कुटुंबासह पाहता येतील असे दर्जात्मक कार्यक्रम सादर झाले, तर नव्या पिढीसह सर्व स्तरांतील प्रेक्षक पुन्हा या लोककलेकडे आकर्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निर्माता सक्षम राहिला तर कलाकार टिकेल आणि कलाकार टिकला तरच महाराष्ट्राची सांस्कृतिक शान असलेली लावणी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल, असे सांगत त्यांनी निर्मात्यांच्या आर्थिक सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व असल्याचे नमूद केले. लावणी कलाकार आणि निर्मात्यांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे शासनापुढे मांडण्यासाठी पुण्यात ‘लोककला लावणी निर्माता कलाकार संघ’ स्थापन करण्यात आला आहे. या संघाच्या माध्यमातून कलाकारांचे हक्क, कल्याणकारी योजना आणि आर्थिक मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली.

COMMENTS