नांदेड : पश्चिम बंगाल, आसाम व पुदुच्चेरी येथील भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा जल्लोष नांदेड शहरात रंगात आला; मात्र या आनंदोत्सवाला अति उत्साही कार

नांदेड : पश्चिम बंगाल, आसाम व पुदुच्चेरी येथील भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा जल्लोष नांदेड शहरात रंगात आला; मात्र या आनंदोत्सवाला अति उत्साही कार्यकर्त्यांच्या बेजबाबदार वर्तनाने गालबोट लागले. फटाक्यांच्या धडाक्यात सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यातूनच काही भाजपा पदाधिकार्यांबरोबर पोलिसांची तीव्र खडाजंगी उभी राहिली.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. गर्दीच्या मध्यभागीच फटाक्यांची आतिषबाजी सुरू करण्यात आली होती. कोणतीही सुरक्षित अंतराची काळजी न घेता, नागरिकांच्या जवळच स्फोटक फटाके उडवले जात होते. यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता ओळखून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला आणि फटाके थांबवण्याचे निर्देश दिले. मात्र, काही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत उलट आक्रमक भूमिका घेतली. एक माजी नगरसेवक ( जो सध्या भाजपामध्ये आहे) पोलिसांशी उघडपणे वाद घालत अरेरावी केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, तरीही काही काळ तणावपूर्ण वातावरण कायम राहिले. शहरातील गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे बेजबाबदार फटाकेबाजी करणे हे गंभीर धोक्याचे कारण ठरू शकते. प्रशासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या असतानाही नियमांचे उल्लंघन झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत दिले असून, भविष्यात अशा प्रकारच्या अतिरेकावर कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे.जल्लोष साजरा करताना जबाबदारीची जाणीव ठेवणे अपेक्षित असताना, अति उत्साहाने नियमांना हरताळ फासल्यामुळे हा आनंदोत्सव वादाच्या भोवर्यात अडकला आहे. फटाके वाजवत असताना उपस्थित महिला व कार्यकर्त्यांना काही इजा होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक होते.

COMMENTS