आमदारांनी नव्हे तर मनपाने केला नूतनीकरणावर दीड लाखाचा ख़र्च

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदारांनी नव्हे तर मनपाने केला नूतनीकरणावर दीड लाखाचा ख़र्च

अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करणार्‍यांनी शिवतीर्थ नूतनीकरणासाठी एक छदाम देखील आपल्या आमदार निधीतून दिलेला नाही. या

कर्जत तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 4 कोटी 25 लाखांचा निधी
ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील यांचे सातारा येथे निधन
डॉ. काळे करणार दर मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी

अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करणार्‍यांनी शिवतीर्थ नूतनीकरणासाठी एक छदाम देखील आपल्या आमदार निधीतून दिलेला नाही. या नूतनीकरणावर मनपाने एक लाख 55 हजार रुपये खर्च केल्याचा दावा शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे राष्ट्रवादीचे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेले नूतनीकरण सध्या शहरात चर्चेत आहे. या कार्यक्रमात जगतापांनी शिवसेनेचा अपमान केला व स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे तर या सोहळ्यात हिंदी चित्रपट गीतावर आ. जगतापांनी नाच केल्याने त्यांनी महाराजांची माफी मागावी, अशी मागणी शहर काँग्रेसने केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी पुन्हा आ. जगतापांवर टीकास्त्र सोडले आहे.
याबाबत काळे यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसर नूतनीकरणासाठी प्रत्यक्षात खर्च कुणी केला याची वास्तववादी माहिती समोर आली आहे. महापालिका शहर अभियंता यांच्या स्वाक्षरीने दि. 5 जानेवारी रोजी एका खासगी ठेकेदाराच्या नावाने पुतळा व परिसर नूतनीकरणाची ऑर्डर मनापाने जारी केली होती. यामध्ये जीएसटी व्यतिरिक्त निविदा रक्कम रुपये 1,55,782 ठरविण्यात आली आहे. तसेच काम पूर्ण करण्याचा कालावधी दोन महिने नमूद करण्यात आला आहे. हा खर्च महापालिकेच्या पुतळे उभारणे सन 2021-2022 या लेखा शीर्षकाखाली दाखवण्यात आला आहे. हे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांच्यावर सोपवण्यात आली होती. मनपाची ही ऑर्डरच काँग्रेसच्यावतीने समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली असून प्रसारमाध्यमांना देखील ती उपलब्ध करून दिली गेली आहे.
काळे यांनी याबाबत पुढे म्हटले आहे की, महापालिकेच्या खर्चातून म्हणजेच अहमदनगरवासीयांच्यावतीने जमा करण्यात आलेल्या कररूपी पैशातून श्रद्धेय महाराजांच्या पुतळा व परिसराचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये आमदारांच्या आमदार निधीतून त्यांनी एक छदाम देखील उपलब्ध करून दिलेला नाही. मात्र, महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खर्चातून केलेल्या कामात राजकारण करीत आपली राजकीय पोळी त्यांनी भाजून घेतली आहे, असा आरोप आ. जगतापांचे नाव न घेता करून ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारा व्यक्ती अशा प्रकारे शिवप्रेमींची घोर फसवणूक कदापी करू शकत नाही. किंबहुना छत्रपतींच्या नावाचा दुरुपयोग करीत नगर मनपाने रयतेच्या कररूपी पैशातून केलेल्या खर्चावर आपली राजकीय पोळी भाजणारा आमदार नगर शहराला लाभला, हे नगरकरांचे दुर्दैव आहे. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार्‍या आमदाराकडून शिवप्रेमींनी व नगरकरांनी यापेक्षा दुसरी काय अपेक्षा करावी ? अशी उद्वेगजनक प्रतिक्रियाही काळेंनी व्यक्त केली आहे.

COMMENTS