राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये नागपूरहून गडचिरोलीसाठी निघताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. टेक

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये नागपूरहून गडचिरोलीसाठी निघताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. टेक-ऑफ घेतानाच पायलटच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने उड्डाण तात्काळ रद्द करण्यात आले आणि एक मोठा अनर्थ टळला. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे आज सकाळी नागपूरहून गडचिरोली येथील सुरजागड प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यासाठी रवाना होणार होते. सकाळी पावणे नऊच्या सुमारास सर्व तयारी पूर्ण झाली होती. मंत्री उदय सामंत हेलिकॉप्टरमध्ये बसले, हेलिकॉप्टर स्टार्ट झाले आणि टेक-ऑफ घेण्याच्या तयारीत असतानाच पायलटला अचानक हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची जाणीव झाली.
पायलटने अत्यंत सतर्कता दाखवत क्षणाचाही विलंब न लावता उड्डाण रद्द केले. या घटनेला स्वतः उदय सामंत यांनी दुजोरा दिला आहे. अपघात टळल्यानंतर उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, “सकाळी पावणे नऊ वाजता सुरजागड प्रकल्पाच्या पाहणीसाठी निघालो होतो. स्टार्ट केल्यानंतर टेक-ऑफ घेताना पायलटने बिघाड ओळखला. सुदैवाने आम्ही सुरक्षित असून आता बायरोड गडचिरोलीकडे रवाना झालो आहोत.” दुसरीकडे, उड्डाणापूर्वी करण्यात येणाऱ्या तांत्रिक तपासणीत हा बिघाड आधी का लक्षात आला नाही? असा सवाल उपस्थित करत स्थानिक शिवसैनिकांनी या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, विदर्भातील खनिज संपत्ती आणि नेटवर्कला गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी सुरजागड विकास प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी सामंत आता रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे रवाना झाले आहेत.
पायलटच्या प्रसंगावधानाने मंत्री उदय सामंत यांच्यासह सर्वजण सुरक्षित राहिले असून पुढील दुर्घटनेचा धोका टळला आहे. या घटनेच्या चौकशीबाबत आता प्रशासन काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

COMMENTS