माई नावाचं वादळ झालं शांत

Homeताज्या बातम्यासंपादकीय

माई नावाचं वादळ झालं शांत

काही व्यक्ती जन्माला येतानांच सोबत संघर्ष घेऊन येतात. मात्र आयुष्यभर संघर्ष करत असतांना, त्या कधी याचं भांडवल करत नाही. तर त्या संघर्षातून उद्याच्या

भारत-चीन संघर्ष नव्या वळणावर
सिंचन प्रकल्पांचे गौडबंगाल  
दुष्काळ दारात…

काही व्यक्ती जन्माला येतानांच सोबत संघर्ष घेऊन येतात. मात्र आयुष्यभर संघर्ष करत असतांना, त्या कधी याचं भांडवल करत नाही. तर त्या संघर्षातून उद्याच्या भविष्याची बीजे रोवतात. त्या संघर्षातून आपले स्वतःचे विश्‍व निर्माण करतात. अशीच एक अनाथांची आई म्हणजेच सिंधुताई सपकाळ जन्मतःच वाटयाला संघर्ष घेऊन जन्माला आली. आई-वडिलांना मुलगा हवा होता, मात्र झाली मुलगी. आणि येथुनच सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षाची बीजे रोवली गेली.
सिंधूताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा येथे झाला होता. त्यांचे वडिलांकडचे आडनाव साठे असे होते. तर त्यांना घरी सर्वजण चिंधी असे म्हणत असे. चिंधी ही सर्वात मोठी मुलगी तर पाठी एक भाऊ आणि एक बहिण असे कुटुंब. त्या पाच वर्षांच्या असतांना त्यांचे वडील त्यांना पिंपरीमधी गावात घेऊन आले. सिंधुताईची चुणूक बघून मुलीने शिकावे अशी वडिलांची इच्छा तर आईचा सक्त विरोध. मात्र सिंधुताई कशातरी चौथीपर्यंत शाळा शिकल्या. पण पुढे त्यांना शिक्षण घेता आले नाही. मग सिंधुताईंना शाळेऐवजी गुरं राखायला पाठवायला सुरूवात झाली. त्यानंतर अल्पवयातच लग्न झालं आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नात सिंधुताईंचे वय होते अकरा वर्षं आणि नवर्‍याचे वय तीस वर्षं. घरी प्रचंड सासूरवास. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि लपवून ठेवत वाचाण्याचा प्रयत्न करायच्या. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. त्या सांगतात, तेव्हा गुरं वळणं हाच व्यवसाय असायचा. गुरंही शेकड्यांनी असायची. त्यांचं शेण काढता काढता कंबरडं मोडायचं. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणार्यांना मजुरी पण शेण काढणार्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथं मी बंड पुकारलं. लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. सिंधुताईने हा लढा जिंकला आणि येथुन गावकर्‍यांना एक नवे उमदे नेतृत्व मिळाले. मात्र या लढयातून त्यांची हालअपेष्टा आणि खरा संघर्ष सुरू झाला. या लढयाने जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. आणि सिंधुताई डोईजोड होईल म्हणून, त्याने सिंधुताईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत, तिच्या पोटात वाढणारे मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवर्‍याच्या मनात संशय निर्माण झाला, आणि नवर्‍याने लाथा-बुक्कयांने मारहाण करत, त्यांना गोठयात आणून टाकले. अर्धमेल्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवर्‍यांने घराबाहेर काढल्यानंतर गावकर्‍यांनी ही गावातून हाकलले. आई-वडिलांकडे गेल्यावर त्यांनी ही घरातून बाहेर काढलं. येथुनच सिंधुताईचा संघर्ष आणि पुढील प्रवास सुरू झाला. रेल्वेत कधी स्टेशनवर भीक मागत त्या हिंडायच्या. येथुनच वाट फुटेल तिथे त्या चालत राहिल्या. संघर्ष तर पाचवीला पुजलेलाच. पण या संघर्षात देखील उद्याची बीजे दडलेली असतात, हे माईंना चांगलेच माहित होते. यानंतर मोलमजुरी करून पोट भरत असतांना त्यांना अनेक अशी मुले भेटली, जी भीक मागून आपली पोटाची भूक भागवत होती. मग माईने अशा निराश्रितांना आपल्या पदरापाशी घेतलं. येथुनच माई अनेक निराधारांची आई झाली. आणि अस्तित्वात आले एक निराश्रित सदन, अस्तित्वात आले. येथुनच माई नावाचे एक कुटुंब अस्तित्वात आले. आणि याच कुटुंबांचा कधी वटवृक्ष झाला ते कळले देखील नाही. अशी ही निराधारांची माय, माई या अनाथांना सोडून अनंतात विलीन झाली. या अनाथांच्या माईंना विनम्र अभिवादन.

COMMENTS