नायगाव: गावपातळीवरील प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कामकाजाबाबत सध्या नायगाव तालुक्यातील जनता गंभीर अडचणीत सापडली आहे. तालुक्य

नायगाव: गावपातळीवरील प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कामकाजाबाबत सध्या नायगाव तालुक्यातील जनता गंभीर अडचणीत सापडली आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कार्यरत असलेले अनेक ग्रामसेवक शासन नियमांनुसार आपल्या मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याची बाब समोर आली असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असल्याने जन्म-मृत्यू नोंदी, रहिवासी दाखले, विवाह नोंदणी, कर वसुली, नमुना नंबर ८, ग्रामसभा आयोजन आणि घरकुल योजना यांसारखी महत्त्वाची कामे त्यांच्यामार्फत केली जातात. मात्र, अनेक ग्रामसेवक गावात न राहता नायगाव, नांदेड किंवा इतर शहरांमध्ये वास्तव्यास असल्याने नागरिकांना साध्या कामांसाठीही वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. अनेक ग्रामसेवक महिन्यातून केवळ एक-दोन वेळाच गावात येत असून, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका असल्यासच त्यांची उपस्थिती दिसून येते. उर्वरित काळात ग्रामपंचायत कार्यालय बंदच राहत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
शेतकरी, मजूर आणि ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक त्रस्त
ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. दैनंदिन मजुरी सोडून तालुक्याच्या ठिकाणी जाणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने अनेकांची कामे महिनोनमहिने प्रलंबित आहेत. एखाद्या प्रमाणपत्रासाठी फोन केला असता, “सोमवारी किंवा मंगळवारी पंचायत समितीत या” असे उत्तर ग्रामसेवकांकडून मिळत असल्याचे नागरिक सांगतात. मुलांच्या शाळेचे दाखले आणि संजय गांधी निराधार योजनेच्या कामासाठी वृद्ध नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नायगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधितांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
‘ग्रामस्वराज्य’ संकल्पनेलाच तडा
महात्मा गांधी यांनी मांडलेली ग्रामस्वराज्याची संकल्पना गावपातळीवरील सक्षम प्रशासनावर आधारित आहे. मात्र, ग्रामसेवकच मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना गावातच शासकीय सेवा मिळण्याचा उद्देश अपूर्ण राहतो. यामुळे शासनाच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यात मोठे अडथळे निर्माण झाले असून, एकप्रकारे ग्रामस्वराज्य संकल्पनेलाच तडा गेला आहे.

COMMENTS