नांदेड: तामसा येथील नांदेड रोडलगत मुख्य रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणाच्या प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नागरिकांच्या तक्रारीची

नांदेड: तामसा येथील नांदेड रोडलगत मुख्य रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणाच्या प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद नांदेडच्या ग्रामपंचायत विभागाने पंचायत समिती हदगावच्या गटविकास अधिकार्यांना चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य रस्त्यालगत सुरू असलेल्या एका खासगी बांधकामामुळे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. यासंदर्भात स्थानिक वृत्तपत्रांमधूनही बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. जिल्हा परिषद नांदेडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २८ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे संबंधित प्रकरणाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुस्थिती तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अतिक्रमण आढळल्यास नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांच्या मते, मुख्य रस्त्याच्या हद्दीत होणारे कोणतेही अतिक्रमण वाहतुकीस अडथळा निर्माण करू शकते आणि भविष्यात अपघातांनाही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे चौकशी निष्पक्षपणे होऊन दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, संबंधित बांधकामाचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणाची परिसरात चर्चा रंगली आहे. आता प्रशासनाच्या चौकशी अहवालातून प्रत्यक्षात अतिक्रमण झाले आहे की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने नागरिकांचे लक्ष चौकशीच्या निष्कर्षाकडे लागले आहे.

COMMENTS