पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चरवड वस्तीतील मोकळ्या मैदानात घडलेल्या

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चरवड वस्तीतील मोकळ्या मैदानात घडलेल्या या प्रकारात सुरज गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, सूरज गायकवाड हा आपल्या मित्रासह परिसरातील मैदानात थांबलेला असताना काही जणांनी तेथे येऊन त्यांना गाठले. जुना वाद उकरून काढत संबंधितांनी दोघांवर मारहाण सुरू केली. मारहाण सुरू असतानाच एका व्यक्तीने पिस्तूलातून गोळी झाडली. गोळी लागल्याने सुरज गंभीर जखमी झाला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी अवस्थेत सुरज याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पंचनामा करण्यात आला असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. या प्रकरणी संबंधित संशयितांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नेमली आहेत. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पुन्हा चिंता व्यक्त होत आहे.

COMMENTS