नांदेड: तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारासंदर्भातील १९५६ चा विद्यमान कायदा रद्द करून नवीन कायदा लागू करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या

नांदेड: तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारासंदर्भातील १९५६ चा विद्यमान कायदा रद्द करून नवीन कायदा लागू करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयास बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) शहर जिल्हाध्यक्ष मनबीरसिंघ ग्रंथी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भाटिया समितीच्या शिफारशींनुसार ’तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम’ या नव्या कायद्याच्या प्रारूपास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही २०२४ मध्ये अशाच प्रकारचा कायदा लागू करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र शीख समाज व धार्मिक नेतृत्वाच्या तीव्र विरोधामुळे तो प्रलंबित ठेवण्यात आला होता.
मनबीरसिंघ ग्रंथी यांनी सांगितले की, तख्त सचखंड श्री हजूर साहिबचे पंज प्यारे साहिबान तसेच स्थानिक शीख समाजानेही या सरकारी निर्णयास कडक शब्दांत विरोध दर्शविला आहे. धुपिया बाबा रामसिंघजी यांनी जथेदार बाबा कुलवंतसिंघजी व पंज प्यारे साहिबान यांच्या उपस्थितीत एका व्हिडिओ संदेशाद्वारे हुकूमनामा जारी करून १९५६ चा कायदा रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध नोंदविला आहे. शीख समाजाच्या धार्मिक व प्रशासकीय बाबींमध्ये कोणताही बाह्य हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही, असा इशारा देत धार्मिक स्थळांच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप टाळावा, अशी मागणी ग्रंथी यांनी केली. तसेच समाजाच्या धार्मिक भावना डावलल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

COMMENTS