Homeताज्या बातम्या

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच व्हावी : सावंत

अकोले : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचा मार्ग मूळ संकल्पित मार्गानेच करण्यात यावा, या मागणीसाठी अकोले व संगमनेर तालुक्यांतील जनतेच्या वतीने मोठे जनआ

देगलूर उपजिल्हा रुग्णालयात ८९.७० लाखांच्या अपहाराचा पर्दाफाश; वैद्यकीय अधीक्षकांसह ५ जणांवर गुन्हा
कायद्याचा दणका: किनवटच्या वेशीवर ’दहशती’चा माज उतरला; हातात तलवार घेणारा हद्दपार आरोपी जेरबंद
ड्रग्सच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देणारा पोलिस अखेर निलंबित! मुंबई पोलिसांची कारवाई, राजकीय वातावरण तापले

अकोले : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचा मार्ग मूळ संकल्पित मार्गानेच करण्यात यावा, या मागणीसाठी अकोले व संगमनेर तालुक्यांतील जनतेच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला. या मागणीसाठी त्यांच्या मूळ गावी रुभोडी येथे लवकरच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याबाबत चर्चा झाली.

सावंत म्हणाले, ‘‘नाशिक-पुणे रेल्वे मार्गाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खेड ते नाशिक या मार्गासाठी तत्कालीन खासदार व आमदारांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतरही विद्यमान लोकप्रतिनिधींनी संसदेत हा प्रश्न मांडला आहे. २०१२ मध्ये या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून सर्वेक्षणही करण्यात आले होते. त्यामुळे तीन जिल्ह्यांतील अनेक तालुके व गावांसाठी हा जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे.’’

मात्र, रेल्वे मार्गाबाबत शासनाची स्पष्ट भूमिका अद्याप समोर आलेली नसल्याने अकोले व संगमनेर तालुक्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. या विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार-खासदारांनी शासन पातळीवर नेमके कोणते निर्णय झाले आहेत, याची माहिती जनतेसमोर मांडावी. तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून या प्रश्नाचा पाठपुरावा करून स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

संकल्पित नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सह्याद्रीच्या पट्ट्यातून जाणारा असून, त्याचा अकोले तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागाला मोठा फायदा होऊ शकतो. रेल्वेमुळे हा भाग प्रमुख शहरांशी जोडला जाईल. तसेच नव्या पिढीला शिक्षण व रोजगारासाठी पुण्यासारख्या शहरांमध्ये जाणे अधिक सुलभ होईल, असे सावंत यांनी सांगितले.

नाशिक ते खेड या संकल्पित मार्गाच्या प्रश्नावर संबंधित खासदार, आमदार तसेच भविष्यातील लोकप्रतिनिधींनी आतापर्यंतच्या पाठपुराव्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा. शासनाने या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास अकोले-संगमनेर तालुक्यांतील जनतेच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सावंत यांनी दिला.

COMMENTS