Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्मार्ट मीटर बसले, पण महावितरणचा ‘स्मार्ट’ कारभार कोठे? ग्राहकांवर कर्मचार्‍यांची दमबाजी सुरूच!

नांदेड : नांदेड शहरात वीज वितरण व्यवस्थेचा गोंधळ दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत

सायकल ट्रॅक हटवले तरी नांदेडकरांचा वाहतूक श्वास अजून कोंडलेलाच, वाहतूक कोंडी केव्हा संपणार?
काम करणार्‍याला कायम डावलायचं? अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांचा राजकीय वनवास भाजपचा अन्याय की राजकीय गणित ?
25 वर्षांची अखंड सेवा : ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई’ उपक्रमाचा शुभारंभ

नांदेड : नांदेड शहरात वीज वितरण व्यवस्थेचा गोंधळ दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत. शासनाच्या मोठ्या गाजावाजात बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर प्रत्यक्षात ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असून, तंत्रज्ञानाच्या नावाखाली सुरू असलेला भोंगळपणा उघड झाला आहे.
शहरातील अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यातच ग्राहकांनी वेळेवर ऑनलाइन बिल भरूनही महावितरणचे कर्मचारी घरोघरी जाऊन पुन्हा बिल भरण्याचा तगादा लावत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतरही नोंदी अद्ययावत न होणे, किंवा त्या पाहण्याची तसदी न घेता थेट ग्राहकांच्या दारात जाऊन दमबाजी करणे, हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या कर्मचार्‍यांचा वावर केवळ सूचना देण्यापुरता मर्यादित नसून, अनेक ठिकाणी महिलांशी उर्मट भाषेत बोलणे, धमकीवजा इशारे देणे असे प्रकारही घडत असल्याचे समोर आले आहे. विवेक नगर परिसरातील एका घटनेने तर या मनमानीचा कळस गाठला आहे. संबंधित ग्राहकाने ऑनलाइन वीज बिल भरलेले असतानाही कर्मचारी थेट घरी पोहोचले आणि बिल भरण्याची मागणी करू लागले. ग्राहकाने ऑनलाइन भरल्याची पावती दाखवण्याची तयारी दर्शवताच संबंधित कर्मचारी तेथून काढता पाय घेतल्याचे समजते. या प्रकारामुळे महावितरणच्या अंतर्गत समन्वयाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे. एका बाजूला डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवले जाते, तर दुसर्‍या बाजूला त्याच व्यवहारांची दखल घेण्यास यंत्रणा अपयशी ठरत आहे. परिणामी, ग्राहकांना दुहेरी मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, तसेच ऑनलाइन प्रणाली अधिक सक्षम आणि पारदर्शक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा ‘स्मार्ट मीटर’ ही योजना फक्त कागदावरच स्मार्ट राहील आणि प्रत्यक्षात ग्राहकांच्या अडचणी वाढवणारी ठरेल, असा संतप्त सूर शहरात उमटत आहे.

COMMENTS