Homeताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सात कर्तृत्ववान महिलांचा महापालिकेकडून गौरव

महिला व बालकल्याण विभागाचा कौतुकास्पद उपक्रम नांदेड: महाराष्ट्र शासनाच्या एकल महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेच्या महिला व

वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक
माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेत शेतकर्‍यांना मार्गदर्शन; सोयाबीन पिकासाठी विषमुक्त शेतीचा संदेश
गेवराई तालुक्यातील अग्रगण्य ग्रामपंचायतीच्या नाकावर टिच्चून चकलांबा जि.प. माध्यमिक शाळेत घाणीचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे आरोग्य वार्‍यावर

महिला व बालकल्याण विभागाचा कौतुकास्पद उपक्रम

नांदेड: महाराष्ट्र शासनाच्या एकल महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सोमवारी महानगरपालिकेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्वकर्तृत्वावर कुटुंबाचा आर्थिक गाडा यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या, मुला-बाळांना उच्च शिक्षण देणाऱ्या, बचत गटांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या तसेच महापालिकेतील आणि सफाई कामात कार्यरत असलेल्या एकल महिला कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

महिला व बालकल्याण व शिक्षण विभागाच्या सभापती सदिच्छा सोनी-पाटील, उपसभापती निरंजना लांडगे आणि सहाय्यक आयुक्त मनीषा नरसाळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विजयमाला देशमुख, सुरेखा कातकडे, शततारका पांढरे, शेख शेहनाज अली शेख, दैवशिला वाठोरे, स्वप्ना मस्के आणि दिपाली डांगे या सात एकल महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.

“एकल महिलांनी आपल्या आर्थिक व सामाजिक समस्या महिला व बालकल्याण समितीसमोर मांडाव्यात,” असे आवाहन यावेळी बोलताना सभापती सदिच्छा सोनी-पाटील यांनी केले. सभापती या नात्याने एकल महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. सहाय्यक आयुक्त मनीषा नरसाळे यांनी एकल महिलांनी समाजातील इतर महिलांना मदतीचा हात देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नोडल अधिकारी चंद्रकांत कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच कांचन एडके आणि पोफळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमातून एकल महिलांच्या संघर्षमय जीवनप्रवासाला सन्मान देतानाच त्यांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.

COMMENTS