अंबाजोगाई: स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर, अंबाजोगाई येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘संस्कृत बोर्ड उत्तरपत्रिका लेखन मार्गदर्शन’ या वि

अंबाजोगाई: स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर, अंबाजोगाई येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘संस्कृत बोर्ड उत्तरपत्रिका लेखन मार्गदर्शन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी न. क्षी. ब. सं.चे अध्यक्ष मा. श्री. संतोषदादा कुलकर्णी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच संस्कृत विषयाचे शिक्षक मा. श्री. प्रसन्न दिग्रसकर सर आणि स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर व न. क्षी. सं.च्या सचिव तथा मुख्याध्यापिका मा. श्रीमती स्वरुपाताई दिग्रसकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी प्रसन्न दिग्रसकर सर यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाच्या बोर्ड परीक्षेतील उत्तरपत्रिका प्रभावीपणे कशी लिहावी, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याची योग्य पद्धत, गुणदान प्रक्रिया, उत्तरलेखन करताना होणार्या सामान्य चुका आणि त्या टाळण्यासाठी आवश्यक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक विभागातून अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी आवश्यक लेखन तंत्र, उत्तर मांडणी आणि परीक्षेतील वेळेचे नियोजन याबाबत उदाहरणांसह माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मैथिली मगर हिने प्रभावीपणे केले, तर कु. काव्या देशमुख हिने उपस्थितांचे आभार मानले. इयत्ता दहावीचे विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि शाळा प्रशासन यांच्या सहकार्याने हा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. आगामी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.

COMMENTS