Homeताज्या बातम्या

आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून संघर्ष आणि परिवर्तनाची प्रेरणा: प्रा. डॉ. मनोहर सिरसाट

बीड: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून संघर्षाची, परिवर्तनाची आणि सामाजिक समतेची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मनोहर सिरसाट

निकषबाह्य इंग्रजी माध्यम शाळांवर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा – डॉ. रॅपनवाड
दादर आंदोलनात पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग? विरोधकांचा तीव्र संताप; पोलिसांनी फेटाळले आरोप
जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्य संजय राऊतांनाच लागू पडते-कल्याण आखाडे

बीड: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून संघर्षाची, परिवर्तनाची आणि सामाजिक समतेची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मनोहर सिरसाट यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, बीड येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा समाज परिवर्तनातील महत्त्वपूर्ण वाटा अधोरेखित केला. जातीय ध्रुवीकरणाला छेद देत सामाजिक ऐक्याची भावना जोपासली पाहिजे तसेच गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व जपले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ, बीड संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या वतीने दरवर्षी अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे 24 वे वर्ष होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे आयोजन प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांत करण्यात आले होते. प्राथमिक गटासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे, लावण्या आणि लोककला, तर माध्यमिक गटासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य : शोषितांच्या वेदनेचा आवाज हे विषय ठेवण्यात आले होते. प्राथमिक गटातील विजेते प्रथम – कु. लड्डा अमृता संतोष (द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड), द्वितीय – कु. उगले संध्या पांडुरंग (सरस्वती विद्यामंदिर, बीड), तृतीय – कु. धुतालमल आरुषी प्रदीप (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, बीड) माध्यमिक गटातील विजेते : प्रथम – कु. लोकरे स्वरा गोरख (द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड), द्वितीय – चि. प्रधुम्न श्रीहरी घुले (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, बीड), तृतीय – कु. दुबाले अक्षरा अशोक (श्री शिवाजी विद्यालय, बीड), विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 501 रुपये, 301 रुपये व 201 रुपये रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. बापूसाहेब शिंदे, प्रा. पंजाबराव येडे व प्रा. काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. एस. धुतालमल होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव अ‍ॅड. व्ही. बी. मगर, संचालक तथा माजी मुख्याध्यापक व्ही. जी. आव्हाड, संचालक आर. एन. शिंदे, एल. एन. शिंदे, आर. एन. अंकुटे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक हावळे बी. ए. यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक संतोष मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहशिक्षक उत्तम पवळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यालयातील कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS