नांदेड : संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 759 व्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य (जिल्हा नांदेड) यांच्या व

नांदेड : संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 759 व्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य (जिल्हा नांदेड) यांच्या वतीने नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा, मोटारसायकल रॅली, गुणवंत विद्यार्थी सत्कार, समाजभूषण पुरस्कार वितरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने समाजातील एकजूट, संस्कृती आणि शैक्षणिक प्रगतीचा संदेश दिला.
आयटीआय येथील महात्मा फुले पुतळ्यापासून चैतन्यनगर, तरोडा येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयापर्यंत निघालेल्या शोभायात्रेचे उद्घाटन आ.अमर राजूरकर आणि महापौर कविताताई मुळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. लेझीम, ढोल-ताशांचा गजर, वारकरी संप्रदायाचे भजन-कीर्तन आणि संत गोरोबा काकांच्या जीवनावर आधारित आकर्षक जिवंत देखाव्यांनी नांदेडकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, स्वाभिमानी कुंभार समाजातील गुणवंतांनी शिक्षण, उद्योग, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अन्य सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय भरारी घेत समाजाचे नाव उंचावावे. शिक्षण आणि गुणवत्ता हीच समाजाच्या प्रगतीची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डी. पी. सावंत होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, हा संदेश युवकांना दिला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा समाजरत्न, उद्योगरत्न, जीवनगौरव आणि समाजभूषण पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. समाजरत्न पुरस्कार प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, उद्योगरत्न विठ्ठलराव किवळेकर, जीवनगौरव देविदासराव चिलवंतकर, तर समाजभूषण पुरस्कार डॉ. सुधाकर तहाडे, पुंडलिकराव घुमलवाड आणि धनराज शिरोळे यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी लातूर फाटा, सिडको येथील संत गोरोबा काका मंदिराच्या सभागृहासाठी 15 लाख रुपयांच्या निधीचे मंजुरीपत्र सुपूर्द केले. या योगदानाबद्दल स्वाभिमानी कुंभार समाजाने त्यांचे विशेष आभार मानले. यावेळी भाजप ओबीसी प्रदेशाध्यक्ष संजय गाते, प्रदेशाध्यक्ष विजयराव देवडे लहानकर, विश्वनाथ कोलमकर, शिवाजी पांगरीकर, बालाजीराव घुमलवाड, लक्ष्मण विभूते, कविता राजे यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्ड आणि बालाजीराव घुमलवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विभूते यांनी मानले.

COMMENTS