अहिल्यानगर : रब्बी कांदा बियाण्यांमध्ये खरीप कांदा बियाण्यांची भेसळ करून शेतकर्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द

अहिल्यानगर : रब्बी कांदा बियाण्यांमध्ये खरीप कांदा बियाण्यांची भेसळ करून शेतकर्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द फसवणूक व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून निकृष्ट व परवानाविना विक्री होणार्या बियाण्यांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत बीज निरीक्षक तथा कृषी अधिकारी बाळासाहेब रामचंद्र कांबळे (रा. नंदनवन कॉलनी, पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांनी बुधवारी (20 मे) रात्री फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाडळी शिंदे (ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) येथील मे. यमुनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचा संचालक सुरज शिवानंद शिंदे व शिंगवे नाईक (ता. अहिल्यानगर) येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचा मालक निखील गोविंद पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (19 मे) सकाळी 11 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास शिंगवे नाईक येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित विक्रेत्याकडे आवश्यक परवाना नसताना बियाण्यांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. तपासादरम्यान रब्बी कांदा बियाण्यांमध्ये खरीप कांदा बियाण्यांची भेसळ आढळून आली. या भेसळीमुळे कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून अनेक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
संबंधित संशयित आरोपींनी बियाणे शेतकर्यांना विक्री केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक, बीज अधिनियम कलम, बियाणे नियम, बियाणे (नियंत्रण) आदेश कलम तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे करीत आहेत.

COMMENTS