कर्जत : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली अस

कर्जत : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते किरण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी अधिकृत यादी जाहीर करत ही घोषणा केली. या निवडीमुळे कर्जत तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
किरण पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी तळागाळात जाऊन सातत्याने काम केले आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवत त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या शांत, संयमी आणि संघटन कौशल्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे ते पक्षामध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदासह जिल्ह्यातील विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात, निवडणुकीत आणि संघटनात्मक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः युवक आणि ग्रामीण कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक म्हणूनही किरण पाटील यांची ओळख आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिल्ह्यात पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांच्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याचे बोलले जात आहे.
किरण पाटील यांच्या निवडीमुळे कर्जत तालुक्याला जिल्हा पातळीवर मोठे प्रतिनिधित्व मिळाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार,” अशी भावना किरण पाटील यांनी व्यक्त केली.

COMMENTS