शेवगाव : शेवगाव शहरात वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, अनेक ठिकाणी वेळेवर पाणी न मिळाल्याने झाडे कोमेजून जळण

शेवगाव : शेवगाव शहरात वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, अनेक ठिकाणी वेळेवर पाणी न मिळाल्याने झाडे कोमेजून जळण्याच्या स्थितीत पोहोचल्याचे चित्र दिसून येत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे यांनी सामाजिक माध्यमांद्वारे आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
या पार्श्वभूमीवर डॉ. नीरज लांडे, अमोल माने, अभिजित आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने पाण्याचे टँकर उपलब्ध करून वृक्षारोपण केलेल्या झाडांना पाणी देण्याचे काम हाती घेतले. या उपक्रमामुळे कोमेजलेल्या झाडांना नवसंजीवनी मिळाल्याने नागरिकांकडून या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, शेवगाव नगरपरिषदेकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून शहरात वृक्षारोपण करण्यात आले असले, तरी त्यानंतर झाडांच्या देखभाल व संवर्धनाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. “फक्त कागदोपत्री कामे दाखवून निधी खर्च झाल्याचे दाखवायचे आणि शासनाची दिशाभूल करायची का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे शासनाकडून “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश दिला जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात लावलेल्या झाडांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित अधिकारी व जबाबदार यंत्रणांवर कारवाई होणार का, याकडे आता शेवगावकरांचे लक्ष लागले आहे.
या वेळी डॉ. नीरज लांडे, जगदीश धूत, दत्तात्रय फुंदे, अमोल माने, अभिजित आव्हाड, सुधीर आपटे तसेच स्टेट बँकेचे शाखाधिकारी उपस्थित होते. त्यांनी झाडांना पाणी देण्याच्या उपक्रमाचे स्वागत करत त्याचे कौतुक केले. तसेच फिरोज पठाण, संजय मेहेर, सुरेश पाटील यांच्यासह अनेक नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
दरम्यान, आगामी काळात पावसाळ्यानंतर शहरातील दुभाजकांचे सुशोभीकरण करून आकर्षक फुलझाडे लावण्याचा मानस डॉ. नीरज लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला असून, शेवगावच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS