Homeताज्या बातम्याबीड

विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या : मुलांना नेमकं काय हवं आहे?

आज महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब बनली आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, देशात

घरकुल लाभार्थ्यांच्या तांत्रिक त्रुटी तातडीने सोडवून हप्ते खात्यात जमा करा: सरपंच भागवत दराडे यांची मागणी
महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय धोंडे; व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप बिनविरोध
हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


आज महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब बनली आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा वाटा चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. बीडसारख्या जिल्ह्यांमध्येही वाढता मानसिक ताण, स्पर्धा आणि अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करताना दिसत आहे.
परीक्षेचा ताण, कमी गुण, करिअरची भीती, कौटुंबिक समस्या, भावनिक एकटेपणा आणि सततची तुलना यामुळे अनेक विद्यार्थी आतून खचत चालले आहेत. काही मुलं बाहेरून शांत दिसतात; मात्र त्यांच्या मनात भीती, असुरक्षितता आणि अपयशाची वेदना सुरू असते. आज प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करताना दिसतात. मला जे दुःख भोगावं लागलं, ते माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही भावना प्रत्येक पालकाच्या मनात असते. त्यामुळे चांगले शिक्षण, सुविधा, क्लासेस, महागड्या वस्तू, मोबाईल अशा सर्व गोष्टी मुलांना देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, एक महत्त्वाचा प्रश्न आहे – मुलांना खरंच फक्त पैसा आणि वस्तू हव्या असतात का? मानसशास्त्र सांगते की मुलांना सर्वाधिक गरज असते ती – सहानुभूतीपूर्वक ऐकून घेणार्‍या व्यक्तीची प्रेम आणि सुरक्षिततेची भावनिक आधाराची प्रोत्साहनाची आणि मी तुझ्यासोबत आहे या विश्वासाची जेव्हा मुलांना प्रेम, जिव्हाळा आणि सुरक्षितता मिळते, तेव्हा त्यांना मानसिक स्थैर्य आणि भावनिक सुरक्षितता अधिक जाणवते. परंतु सतत तुलना होणे, फक्त गुणांवरून मूल्य ठरवणे, अपेक्षांचे ओझे, राग आणि संवादाचा अभाव यामुळे मुलं आतून एकटी पडू लागतात. विद्यार्थ्यांना स्पर्धेपेक्षा समजून घेण्याची जास्त गरज आहे. विद्यार्थ्यांचे जीवन अमूल्य आहे. गुण, परीक्षा किंवा अपयश हे आयुष्याचा फक्त एक छोटासा भाग आहेत; संपूर्ण आयुष्य नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळी क्षमता, वेगळे कौशल्य आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. त्यामुळे तुलना करण्यापेक्षा त्यांना समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. आज मुलांना केवळ अभ्यासासाठी मार्गदर्शन नको आहे, तर भावनिक आधार, सहानुभूतीपूर्वक ऐकून घेणारी माणसं, प्रोत्साहन आणि तू एकटा नाहीस हा विश्वास हवा आहे. पालकांनी काय करायला हवं?  मुलांशी रोज मनापासून संवाद साधा  किती मार्क पडले? यापेक्षा तू ठीक आहेस ना? हे विचारा  मुलांच्या भावना नाकारू नका  चूक झाली तरी त्यांना साथ द्या  प्रेम शब्दांतून आणि कृतीतून व्यक्त करा मुलांना हे जाणवणं खूप गरजेचं आहे – तू फक्त गुणांसाठी नाही, तर जसा/जशी आहेस तसाच/तशीच आमच्यासाठी महत्त्वाचा/महत्त्वाची आहेस. विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणाची नाही, तर भावनिक सुरक्षिततेची, समजून घेणार्‍या सहवासाची आणि प्रेमळ आधाराची गरज आहे. त्यांच्या वागण्यात चिडचिड, शांत राहणे, एकटेपणा, अभ्यासात मन न लागणे किंवा सतत तणाव दिसत असेल तर दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी समुपदेशन आणि भावनिक आधार मिळाल्यास अनेक गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकतात. कधी कधी विद्यार्थ्यांना सल्ल्यापेक्षा जास्त गरज असते ती – कोणीतरी मनापासून ऐकून घेण्याची. मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा जास्त गरज असते ती – वेळ, प्रेम आणि समजून घेणार्‍या माणसांची.
– मनिषा बिक्कड/घुले
मानसशास्त्रीय समुपदेशक
ङळषश उेरलह । ठशश्ररींळेपीहळि उेरलह

COMMENTS