Homeताज्या बातम्या

लिंबागणेश मंडळात महसूल प्रशासनाची पाहणीअंजनवतीतील नुकसानग्रस्तांना तहसीलदार शेळके यांचा तातडीचा दिलासा

बीड : तालुक्यातील लिंबागणेश मंडळ परिसरात महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्ते, जमीन हस्तांतरण, पंच

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला आढावा
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जनगणना प्रगणकाला दिली स्वतःची माहिती; सक्रिय सहभागातून नागरिकांना दिला सहकार्याचा संदेश
उष्माघातापासून सावध राहा ; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी


बीड : तालुक्यातील लिंबागणेश मंडळ परिसरात महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्ते, जमीन हस्तांतरण, पंचनामे तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांची सविस्तर पाहणी करून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. या दौर्‍यात महसूल विभागाचा लोकाभिमुख आणि संवेदनशील चेहरा पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
अंजनवती येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांची विचारपूस केली. घरांची पडझड, पत्र्यांचे नुकसान तसेच घरगुती साहित्य, खते व बियाण्यांचे झालेले नुकसान याची पाहणी करून तातडीने पंचनामा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या पाहणी दौर्‍यात मंडळ अधिकारी उज्वला राऊत, तलाठी नारायण दराडे, डॉ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोरे तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने थेट बांधावर येऊन समस्या ऐकून घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, बेलेश्वर वस्ती येथे नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याची मंडळ अधिकारी उज्वला राऊत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याबाबत वस्तुस्थिती समजून घेऊन पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मसेवाडी येथे गट क्रमांक 183 मधील जमीन व विहीर हस्तांतरण प्रकरणाचीही पाहणी करण्यात आली. लोणी घाट परिसरात गट क्रमांक 144, 145, 147 व 387 मधील पंचनाम्यादरम्यान शेतकर्‍यांनी रस्त्याच्या हद्दीच्या खुणा स्पष्ट करण्याची मागणी केली. यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत अर्जदार संभाजी शहाजी कदम यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देत समन्वयातून प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. तसेच मांजरसुंबा-ससेवाडी रस्ता खुला करण्याच्या ठिकाणाचीही तहसीलदार शेळके यांनी पाहणी केली. या वेळी मंडळ अधिकारी सोनाली कदम-शेळके, ग्राम महसूल अधिकारी रेश्मा तानगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बीड तालुक्यात तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली मागील दीड वर्षांत महसूल प्रशासनाने विविध लोकाभिमुख उपक्रम राबवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत 16 शिबिरांमधून 768 फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तसेच 12,000 हून अधिक डिजिटल 7/12 उतारे, 2,957 डिजिटल 8 अ उतारे, 2,484 विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. एक खिडकी योजनेअंतर्गत 98 अर्जांचा निपटारा करण्यात आला असून एकूण सुमारे 30,000 सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. अतिक्रमणमुक्त रस्ते मोहिमेतही बीड तहसीलने उल्लेखनीय कामगिरी करत 64 प्रकरणांमध्ये 100 किलोमीटरहून अधिक शेतरस्ते मोकळे केले आहेत. आहेर चिंचोली, वडगाव, नेकनूर, पिंपळनेर, चौसाळा, नागापूर, करंजगाव, बोरखेड, वानगाव, शिवणी यांसह अनेक गावांमध्ये दीर्घकाळ प्रलंबित रस्ते प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या समन्वयातून महसूल प्रशासनाची कामे अधिक गतिमान झाली आहेत. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून प्रशासनाच्या तत्पर कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS